पुढारी ऑनलाईन डेस्क
ओम भगनी भागोदरी ओम फट स्वाहा हा मंत्र तात्या विंचूला देणारा बाबा चमत्कार अर्थातच राघवेंद्र कडकोळ उर्फ अण्णा यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. काही अभिनयात कठोर किंवा रागिष्ट भूमिका साकारणारे राघवेंद्र मुळात शांत स्वभावाचे होते. कलेवर त्यांचे नितांत प्रेम होते. सरकारी नोकरी सोडून एक उत्तम अभिनेते ते झाले होते.
अनेक दिग्गज कलावंतांसोबत काम करून आपल्या अभिनयाची छाप त्यांनी अनेक चित्रपटांतून सोडली. स्वत: अभिनेता असण्याबरोबरचं त्यांनी नवोदित कलाकारांनाही प्रोत्साहन दिले. अनेक चित्रपटात एकापेक्षा एक भूमिका साकारल्याचं; परंतु, त्यांची झपाटलेला चित्रपटातील बाबा चमत्कार मांत्रिकाची भूमिका चांगलीचं गाजली. या चित्रपटात ते तात्या विंचू अर्थातच अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जो ओम भग भुगे भग्नी भागोदरी, ओम फट स्वाहा हा मंत्र दिला होता. तो मंत्र राघवेंद्र यांच्यासारखा अन्य कुणीही म्हणू शकत नाही. या मंत्रामुळे आणि मांत्रिकेच्या भूमिकेमुळे राघवेंद्र यांची प्रचंड ख्याती झाली. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, किशोरी अंबिये, जयराम कुलकर्णी, पूजा पवार, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
राघवेंद्र हे झपाटलेला या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही झळकले होते.
कृष्णधवल या चित्रपटापासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात करणारे राघवेंद्र यांनी रंगभूमीवरही प्रसिध्दी मिळवली होती. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवलकर या दिग्गज कलावंतासोबत काम केले होते. 'अश्रूंची झाली फुले' नाटकातील त्यांची धर्माप्पा ही भूमिका गाजली होती
'पंढरीची वारी' या चित्रपटात त्यांनी गणा ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांचा दमदार अभिनय वाखाणण्याजोगे होता. या चित्रपटात अभिनेते राजागोसावी, अभिनेत्री आशा पाटील यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत त्यांचा अभिनय कौतुक करणारा ठरला. 'ब्लॅक अँड व्हाईट', 'गौरी', 'सखी', 'कुठे शोधू मी तिला' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 'छोडो कल की बात' या हिंदी चित्रपटातदेखील त्यांची विशेष भूमिका होती.
… तर नौदलात असते राघवेंद्र
राघवेंद्र यांना नौदलात भारतीय आयएनएस विभागात एका टीमसोबत पाठवण्यात आले होते. तेथील अथांग समुद्र, मोठमोठी जहाजे, बोटी पाहून ते भारावून गेले होते. परंतु, टीममधून राघवेंद्र यांना पुन्हा मेडिकल टेस्टसाठी पाठवण्यात आले. याआधी सर्व मेडिकल टेस्ट पास करून त्यांना नौदलात पाठवण्यात आले होते. मग, पुन्हा टेस्ट कसासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एका कानात दोष असल्याचे त्यांना मेडिकल रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.