

कावेरी पाणी वादावरून आयोजित एका रॅली दरम्यान, अभिनेत्री त्रिशा कृष्णनचे नाव न घेता केले गेलेले तथाकथित असभ्य वक्तव्य आणि अपमानजनक विधान प्रकरणी अभिनेत्री-राजकारणी खुशबू सुंदर आणि गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी द्रमुक (DMK) नेते व विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका केली.
अभिनेत्री त्रिशाच्या समर्थनार्थ दक्षिणेतील कलाकार एकवटले
डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः अभिनेत्री त्रिशा कृष्णनबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिलांना राजकीय वादात ओढणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
"उदयनिधी स्टॅलिन यांनी त्रिशाची जाहीर माफी मागावी"; खुशबू सुंदर यांची संतप्त प्रतिक्रिया
उदयनिधी स्टॅलिन यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी या वक्तव्याला असभ्य, खालच्या दर्जाचे आणि महिलांचा अपमान करणारे संबोधले.
खुशबू यांनी म्हटले की, मी उधयनिधी स्टॅलिन यांचे भाषण ऐकले. ते अत्यंत असभ्य, खालच्या पातळीचे आणि अत्यंत अपमानजनक होते; त्यातून त्या राजकीय संस्कृतीचेच दर्शन घडते जी आत्मसात करण्यास ते उत्सुक असल्याचे दिसते. अशी मानसिकता असलेल्या व्यक्ती जर एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करण्याची आणि भविष्यात राज्याचा कारभार चालवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत असतील, तर मग देवच आपला वाली! ज्यांच्यासाठी महिलांचा अपमान करणे, त्यांची विटंबना करणे आणि त्यांना हिणवणे हा एक प्रकारचा 'राजकीय तमाशा' असतो आणि जे आपल्या निष्ठावान समर्थकांच्या टाळ्या, शिट्ट्या व हास्याचा आनंद लुटतात, अशा लोकांकडून आणखी काय अपेक्षा करता येईल? आणि माझ्यापेक्षा हे अधिक चांगले कोणाला समजणार?
त्यांच्या मते, महिलांचा अपमान हा राजकीय तमाशाचा भाग बनू लागला, तर कोणतेही कुटुंब सुरक्षित राहणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र सार्वजनिक व्यासपीठावर वापरल्या जाणाऱ्या भाषेला मर्यादा असणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि त्यांचा राजकीय हल्ल्यांसाठी वापर होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खुशबू यांनी पुढे म्हटले की, जेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुम्ही तुमच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याची कामगिरी, दूरदृष्टी किंवा नेतृत्वाची बरोबरी करू शकत नाही, तेव्हा वैयक्तिक अपमान आणि असभ्यतेचा आधार घेणे हा सर्वात सोपा मार्ग वाटू लागतो.
याशिवाय, अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबद्दल सार्वजनिक व्यासपीठावरून करण्यात आलेल्या कथित अपमानासंदर्भात उदयनिधी स्टॅलिन यांनी बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणीही खुशबू सुंदर यांनी केली. ते आपल्या वक्तव्याची जबाबदारी स्वीकारून माफी मागतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
गायिका चिन्मयी श्रीपदा काय म्हणाली?
''राजकारणातील पुरुषांनी, ज्यांचा त्यांच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा महिलांना त्यात ओढण्याऐवजी केवळ खऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले असते, तर ते किती उत्तम झाले असते.
ती पुढे म्हणाली, तमिळनाडूच्या विरोधी पक्षनेत्यांनी (LoP) जे विधान केले, त्यामागचा कथित अर्थ मला सुरुवातीला समजला नाही; माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने तो मला थोड्या वेळापूर्वी समजावून सांगितला. मला वाटले होते की ते पाणीपुरवठ्याच्या जोडणीबद्दल बोलत आहेत....कमीतकमी त्यांनी आपल्या श्रोत्यांना शांत राहण्यास किंवा सभ्यपणे वागण्यास सांगायला हवे होते, पण त्याऐवजी त्यांनी त्याहूनही वाईट विधान केले....आधीच्या पिढीतील नेत्यांची अश्लील भाषा सामान्य मानली जात असे आणि आता जुन्या काळातील ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणांचे संकलन असलेल्या अनेक 'रील्स' (व्हिडिओ क्लिप्स) फिरत आहेत. पण तरुण पिढीतील नेत्याकडून अधिक चांगल्या वर्तनाची अपेक्षा असते, अश्लीलतेच्या बाबतीत अधिक वाईट वागण्याची नाही. किती निराशाजनक बाब आहे ही.''
नेमका वाद काय?
तंजावर येथे कावेरी जलवाटपाच्या प्रश्नावर डीएमकेने आयोजित केलेल्या आंदोलनातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सभेत उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर टीका केली. त्याचवेळी उपस्थितांमधील काही जणांनी "त्रिशा, त्रिशा" अशा घोषणा दिल्या.
यानंतर उदयनिधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. टीकाकारांच्या मते, त्यांच्या विधानाचा रोख अभिनेत्री त्रिशा यांच्याकडे होता, तर उदयनिधी यांनी नंतर स्पष्टीकरण देत आपला संदर्भ कावेरी नदीच्या पाण्याशी संबंधित असल्याचा दावा केला. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.