Kailash Kher | शिवभक्त गायक कैलाश खेर यांनी पाळला होता नाग, पिशवीत घेऊन फिरायचे, चक्क अंथरुणात घेऊन सोबत झोपायचेही!

तरुणपणातील अचाट धाडसाची दिली एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक कबुली
गायक कैलाश खेर
गायक कैलाश खेर
Published on: 
Updated on: 

Kailash Kher Snake Story प्रसिद्ध गायक, कवी पद्मश्री कैलाश खेर हे खूप मोठे शिवभक्त आहेत. ॠषीकेश सारख्या डोंगरी भागातून येऊन त्‍यांनी बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्‍यांच्या आवाजाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. शिवजींचे ते एवढे निस्सीम भक्त आहेत की वयाच्या २० व्या वर्षी त्‍यांनी एक अस्सल विषारी नाग पाळला होता. ते त्‍याला आपल्या बरोबर असलेल्या पिशवीत घेऊन फिरायचे एवढेच नाही तर झोपताना अंथरुणात सोबत घेऊन झोपायचेही. युट्युबर रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये त्‍यांनी आपल्या आयुष्यातील अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.

जवळपास ३ महिने हा साप त्‍यांच्याजवळ होता. तीन महिन्यांनंतर त्यांनी त्या कोब्राला जंगलात का सोडून दिले, यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. या विषारी कोब्राचे दात काढले होते पण त्‍याच्या फुत्‍कारातून विषाचे अंश बाहेर पडते हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

आम्ही मृत्यूलाही घाबरत नाही

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये कैलाश खेर यांनी सांगितले की, "आम्ही सुमारे १२-१३ वर्षे ऋषिकेशमध्ये राहिलो होतो. त्या काळात आम्ही खूप पायी चालायचो. तिथे नीलकंठ मंदिरही आहे. त्यावेळी आमची वेदपाठकांची एक मंडळी असायची, ज्यांच्यासोबत आम्ही डोंगरदऱ्यांत खूप भटकंती करायचो. जंगलात सापडणारी फळे खायचो, आम्ही वानरांसारखे जीवन खूप जगलो आहोत. त्यामुळेच भगवान शिव आणि हनुमानाची आमच्यावर मोठी कृपा आहे. आम्हाला कशाचीही किंवा कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. आम्ही मृत्यूलाही घाबरत नाही. आम्हाला जन्म आणि मृत्यू दोन्ही सारखेच वाटतात.

कोब्राला खाण्यासाठी उंदराला मारायला लागायचे

कैलाश खेर पुढे म्हणाले आम्ही एक कोब्रा साप पाळला होता. त्यावेळी आमचे वय साधारण २० वर्षे असेल आणि तेवढी समजही नव्हती. तो सुमारे तीन महिने आमच्यासोबत राहिला आणि आमच्या रजईत, आमच्यासोबतच झोपायचा. ते हिवाळ्याचे दिवस होते, हे मला अजूनही आठवते. आम्ही जेव्हा कधी बाहेर जायचो, तेव्हा त्याला आमच्या बॅकपॅकमध्ये सोबत घेऊन जायचो. पण नंतर आम्ही त्याला परत जंगलात सोडून दिले. याचे कारण म्हणजे त्‍या कोब्राला खाऊ घालण्यासाठी उंदीर मारायला लागायचे, एक जिव वाचवण्यासाठी दुसऱ्या जिवाची हत्‍या करावी लागत होती हे पटले नसल्याने नागाला जंगलात सोडून दिले

नागाबरोबर बातचितही करायचो, फुत्‍कारला की लक्ष द्यायचो

‘कोब्राचे विषारी दात काढून टाकले जातात, तरीही त्याच्या फुत्कारावाटे विषाचे तुषार उडतात. त्यामुळे प्रत्येकजण त्याला पाळू शकत नाही. पण त्यावेळी आमची बुद्धीच तशी होती. आम्ही संतांच्या सहवासात, जंगलांत आणि डोंगरांत राहिलो होतो. , डोंगर चढायचो आणि कीटक-काटे यांसारख्या गोष्टी नेहमीच पाहायचो. यामुळे आमची भीती आणि संकोच पूर्णपणे निघून गेला होता. तो कधीकधी फुत्कारायचा, विशेषतः जेव्हा त्याला भूक लागायची आणि आम्ही बराच वेळ त्याच्याकडे लक्ष द्यायचो नाही. तेव्हा तो फुत्कारून आम्हाला आठवण करून द्यायचा की माझ्याकडेही थोडे लक्ष द्या. मी त्‍याला हातात धरुन म्हणायचो, ‘खूप बिघडत चालला आहेस.’ जणू काही आम्ही त्याच्याशी गप्पाच मारत आहोत. त्यानंतर आम्ही त्याला पकडून पिशवीत ठेवून द्यायचो. तो काळच काही वेगळा होता."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.