पुढारी ऑनलाईन डेस्क - गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
गोव्यामध्ये ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. जागतिक स्तरावर नावाजलेल्या या महोत्सवात देश-विदेशातील अनेक दर्जेदार चित्रपट दाखवण्यात आले. महोत्सवाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात 'घरत गणपती' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी मराठी आणि अमराठी लोकांनी चित्रपट पाहिला आणि कौतुक केलं. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी सुद्धा चित्रपटाबाबत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या.
नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर या तरुण दिग्दर्शकाचा पहिलावहिला दिग्दर्शक म्हणून 'घरत गणपती' हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भूषण प्रधान, निकिता दत्ता, अजिंक्य देव, अश्विनी भावे, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे आणि परी तेलंग आदी कलाकारांनी काम केले होते. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाचे वितरण केले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
महाराष्ट्राचा लोकोत्सव असणाऱ्या गणपती सणात एकत्र येणाऱ्या कुटुंबाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली होती. तसेच 'घरत गणपती' हा चित्रपट भारतीय संस्कृतीचं आणि परंपरेचं दर्शन घडवत प्रेक्षकांना भावनिक अनुभूती देणारा आहे. कौटुंबिक नातेसंबंध, त्यातील हेवेदावे आणि गोडवा तसेच सणाचे महत्त्व सांगणारा हा चित्रपट आहे. बांदिवडेकर आणि चित्रपटाचे सह-लेखक आलोक सुतार यांच्या लेखणीतून साकारलेल्या या चित्रपटात गणपती उत्सव आणि मराठी संस्कृती, परंपरा यांचे दर्शन प्रेक्षकांना घडले.
याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना नवज्योत बांदिवडेकर म्हणाले, "माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. माझा हा पहिला मराठी पुरस्कार असून आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी चित्रपटाला पुरस्कार मिळाला याचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी हा पुरस्कार अतुल परचुरे यांना समर्पित केला. या चित्रपटात गणपती बाप्पासाठी त्यांचा आवाज वापरण्यात आला होता.
तसेच पुरस्कारानंतर आता जबाबदारी वाढली असून यापुढेही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा पुढे नेणार आहे. आता अनेक प्रोजेक्ट्सवर काम सुरु असून मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतानांच हिंदी प्रेक्षकांनाही आपलेसे कसे करता येईल, याचाही विचार करत असल्याचे बांदिवडेकर यांनी सांगितले.
नवज्योत हे कोल्हापूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक (स्व.) ॲड. विश्वनाथ बांदिवडेकर यांचा वारसा असणाऱ्या परिवारातील सदस्य असून मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नरेंद्र विश्वनाथ बांदिवडेकर यांचे पुत्र तर मॅटमधील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. अरविंद बांदिवडेकर व डॉ. दिलीप बांदिवडेकर (कोल्हापूर) यांचे पुतणे आहेत.