

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरैशी हिने अलीकडेच पापाराझी संस्कृतीबाबत आपले स्पष्ट आणि संतुलित मत मांडले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हुमा म्हणाली, ‘माझे पापाराझींशी खूप चांगले संबंध आहेत. तेही गरजेचे आहेत. खरं सांगायचं तर, जेव्हा आम्हाला आमचा चित्रपट प्रमोट करायचा असतो किंवा आमच्या वैयक्तिक आयुष्यातील एखादा भाग लोकांसमोर आणायचा असतो, तेव्हा आम्ही स्वतःच त्यांना बोलावतो.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रीमियर, कार्यक्रम किंवा खास इव्हेंटस्साठी कलाकार स्वतः पापाराझींना आमंत्रित करतात. जेव्हा आम्हाला एखाद्या ठिकाणी दिसायचं असतं, तेव्हा आम्ही त्यांना फोन करतो. त्यामुळे सगळा दोष पापाराझींवर टाकणं योग्य नाही. कधी कधी मी चांगली दिसत नसते, तेव्हा मी त्यांना फोटो पोस्ट करू नका असे सांगते आणि बहुतेक वेळा ते माझं ऐकतात.’ असे हुमाने सांगितले. मात्र, पापाराझी संस्कृतीचा नकारात्मक पैलू देखील असल्याचे हुमाने मान्य केले. ती म्हणाली,
‘कधी कधी ते वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणारे प्रश्न विचारतात किंवा चुकीच्या अँगलने फोटो काढतात. एक मर्यादा असते, जी ओलांडू नये, पण ती अनेकदा ओलांडली जाते. एक महिला कलाकार म्हणून मला हे सगळं सहन करावं लागलं आहे. पूर्वी अशा प्रसंगी गप्प राहायचो. माझे उत्तर ट्रेंड होईल, याची भीती वाटायची. पण आता नाही. कुणी चुकीचं वागलं तर मी थेट सांगते असं करू नका आणि कुणालाही करू देऊ नका.’