मुंबई : पुढारी ऑनलाईन
पूर्वी भारतातल्या चित्रपटांमध्ये नायक-नायिकांची चूंबन दृश्ये, शरीरसंबंधांची दृश्ये उघडपणे दाखविली जात नसत. असे सीन्स दाखवण्यासाठी चित्रपटांमध्ये प्ततिकात्मक पद्धती अवलंबल्या जात. नायक-नायिकेचे चूंबन दृश्य पडद्यावर दाखवायचं असल्यास अनेक वेळा स्क्रीनवर दोन फुलं एकमेकांना टक्कर देताना दाखवली जायची. तर नवविवाहित जोडप्याच्या हनीमूनचा सीन दाखवायचा असेल बेडरूममधली लाईट घालवली जायची आणि क्षणात दिवस उजाडताना त्या जोडप्याला एकमेकांच्या बाहुपाशात दाखवलं जायचं. हे पाहिल्यानंतर प्रेक्षक समजून जायचे की पुढं काय झालंय ते.
आता जस-जसा काळ पुढे सरकत गेला तसं-तसा भारतीय चित्रपट बदलत गेला. चूंबन दृश्य आणि इंटीमेट सीन दाखवले जाऊ लागले. त्यात कळस चढवला तो अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणा-या वेब सीरीजनं. अनेक वेब सीरीमध्ये इंटीमेट सीन्स खुल्लम-खुल्ला दाखवले गेले. त्यावरून अनेकवेळा वादसुद्धा झाले.
ज्या प्रकारे ॲक्शन आणि डान्स सीन मोठ्या पडद्यावर परफेक्ट दाखवायचे असल्यास ॲक्शन डायरेक्टर आणि डान्स कोरियोग्राफर यांची नियुक्ती केली जाते. तसच इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यासाठी एका सल्लागाराची मदत घेतली जाऊ लागली आहे. त्याला आपण इंटिमेट सीन्स कोरियोग्राफर असं ही म्हणू शकतो.
आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जी व्यक्ती भारतीय चित्रपटांसाठी इंटिमेट सीन कोरिओग्राफ करते.
आम्ही बोलत आहोत आस्था खन्ना बद्दल, जे इंटिमेसी कोऑर्डिनेटर आहेत. सध्या आस्था शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात इंटीमेट कोऑर्डिनेटरचं काम करत आहे. या आधी आस्थाने बदलापूर, स्टुडंट्स ऑफ द इयर 2, अंधाधुन या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.
आस्था खन्ना भारतातली पहली आणि एकमेव प्रमाणपत्र धारक इंटीमेट कोऑर्डिनेटर आहे. तिने अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील इंटिमेसी प्रोफेशनल्स असोसिएशन मधून इंटिमसी कोऑर्डिनेशनचा १६ आठवड्यांचा कोर्स पूर्ण केला आहे. या प्रोफेशन बाबत कुणालाच माहिती नाही. या कोर्सच्या जोरावर आस्थाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं एक वेगळ अस्तित्व निर्माण केलं आहे. चित्रपट असूद्या की वेब सीरिजमधील न्यूड सीन्स ते चित्रीत करणं हे खूप जटील काम असतं. मात्र, आस्थाच्या कल्पकतेने असे सीन्स खूपच सोप्या पद्धतीने आणि कलाकारांमध्ये आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये वाद न होता चित्रीत होतात.
२६ वर्षांची आस्था खान्ना स्वतःची तुलना अॅक्शन डायरेक्टरशी किंवा कोरिओग्राफरशी करते. माझं नात फक्त शृगांरिक दृश्यांपुरत आहे. सेक्स सीन, नग्रना, लैंगिक हिंसा असे सीन चित्रित करताना जी सुरक्षितता असणे आवश्यक असते, ती जबाबदारी मी पार पाडते, असं त्या सांगतात. दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात ट्युनिंग चांगलं असलं पाहिजे, हे आम्ही पाहातो.
अशी दृश्य चित्रित करताना कलाकराचं शोषण होऊ नये, ही जबाबदारी माझी असते. कलाकरांची सहमती आणि मर्यादा यावर चर्चा केली जाते आणि आवश्यक तसे कपडे आणि इतर सुरक्षेची साधन आम्ही उपलब्ध करून देतो.
क्रोच गार्डस, निप्पल पेस्टीस, बॉडी टेप्स, डोनट पिलो यांचा वापर करून सीन देणाऱ्या कलाकरांता अंतर ठेवलं जात. जेणे करून कलाकरांचा एकमेकांच्या गुप्तांगाला स्पर्श होत नाही.
हॉलीवुड अभिनेत्री शेरन स्टोनने नुकताच इंटीमेट सीनवरून मोठा खुलासा केला आहे. १९९२ मध्ये आलेल्या 'बेसिक इंस्टिंक्ट' या चित्रपटात तिचा अंडरवेयर काढण्याचा सीन तर तुफान गाजला. मात्र तो सीन फसव्या पद्धतीने चित्रित केला गेला होता असं स्पष्टीकरण शेरनने दिलं आहे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात शेरनने म्हटलंय की, बेसिक इंस्टिंक्ट चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला माझी अंडवेअर काढायला सांगितली. 'पांढरा रंग प्रकाश परावर्तित करतो, त्यामुळे प्रेक्षकांना काही दिसणार नाही' असं कारण मला त्यावेळी सांगण्यात आलं.
मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल वर्होवन यांनी शेरनच्या या आरोपांचे खंडन केले आहे. ती खोटी माहिती देते असा पलटवार वर्होवन यांनी केला. चित्रीकरणावेळी शेरनला काय सुरू होतं ते माहिती होतं, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मात्र, जे काही झाले तो माझा विश्वासघात होता, असं नंतर शेरन म्हणली होती.
पण मुळात हा वाद उद्भवू नये यासाठी काही ठोस अशी पावले उचलली गेली असती तर? तर खरच चित्र बदललं असतं.
या वादावरून आस्था खन्ना म्हणते की, 'खूप सोप्या पद्धतीनं हा वाद टाळता आला असता. जर मी त्या ठिकाणी असते तर मी अभ्नेत्री शेरनला तिच्या त्वचेच्या रंगाची अंडरवेयर दिली असती.'
१९९० च्या सुरुवातीला जेव्हा बेसिक इंस्टिंक्ट चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा इंटिमेसी कॉर्डिनेटर ही संकल्पना कुणी ऐकलीही नव्हती.
२०१७ मध्ये #MeToo आंदोलनानंतर या इंटिमेसी कॉर्डिनेटरची मागणी वाढली. याला कारण म्हणजे जगभरातील मनोरंजन क्षेत्रात अनेक लैंगिक छळाच्या घटना समोर आल्या.
आस्था पुढे सांगते की, इंटिमसी कोऑर्डिनेटरचे काम म्हणजे इंटीमेट सीनच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात तालमेल निर्माण करणे. कलाकाराचे शोषण होऊ न देणे. त्याला स्टुडिओमध्ये चित्रीकरणादरम्यान सुरक्षित कसं वाटेल याची काळजी घेणे. जेणेकरून पाच वर्षांनंतर कोणताही कलाकार असं म्हणू शकणार नाही की अमुक-अमुक चित्रपटातील इंटीमेट सेनवेळी त्याचा अनुभव खराब होता.