ऐतिहासिक शालिनी सिनेटोनचे नामोनिशाण मिटले

Published on
Updated on

कोल्हापूर : सतीश सरीकर 

कोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोन (स्टुडिओ) २००८ मध्येच जमीनदोस्त करण्यात आला आहे. किमान सिनेटोनची इमारत असलेली रिकामी जागा तरी ऐतिहासिक परिसर (हेरिटेज ग्रेड-3) म्हणून जतन करण्यात यावा, यासाठी महापालिकेने राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला होता. मात्र, तो प्रस्तावही नामंजूर केला आहे. परिणामी, अनेक वैविध्यपूर्ण चित्रपटांचा साक्षीदार असलेल्या वैभवशाली शालिनी सिनेटोनचे नामोनिशाण मिटले आहे.

राज्य शासनाचे अव्वर सचिव किशोर गोखले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यासंदर्भातील पत्र पाठविले आहे. प्रचलित नियमानुसार त्या जागेवरील बांधकाम व्यावसायिकाच्या रेखांकनास परवानगी द्यावी, असेही पत्रात स्पष्ट केले आहे. 

छत्रपती राजाराम महाराज यांच्या भगिनी श्रीमंत आक्कासाहेब महाराज यांनी ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या माळावर १९३३ मध्ये शालिनी सिनेटोन उभारला. याच ठिकाणी मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एकूण ४७ एकर जागा सिनेटोनसाठी देण्यात आली. 'प्रतिभा', 'उषा', 'सावकारी पाश', 'कान्होपात्रा', 'पिंजरा' आदीसह इतर चित्रपट याच स्टुडिओमध्ये तयार झाले. अनंत माने, राजा परांजपे, राम गबाले यांच्यापासून महेश कोठारे यांच्यापर्यंत अनेकजण सिनेमाच्या शूटिंगसाठी शालिनी सिनेटोनला पसंती देत होते. १९६२ ते १९८५ या काळात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी हा स्टुडिओ चालविण्यासाठी घेतला; पण पुन्हा तो देवासचे महाराज यांच्या ताब्यात देण्यात आला.१९७५मध्ये जयप्रभा व शालिनी स्टुडिओला पर्याय म्हणून कोल्हापूर चित्रनगरी उभारण्याचा निर्णय झाला. पण त्याला त्या काळात मूर्त रुप येऊ शकले नाही. त्यामुळे २००८ पर्यंत शालिनी सिनेटोनमध्येच अनेक मराठी सिनेमांचे चित्रीकरण होत होते.

कालांतराने ४७ एकर जागा नाशिक येथील चांगदेव घुमरे या विकसकाला देण्याचा निर्णय देवासच्या महाराजांनी घेतला. त्यात शालिनी स्टुडिओच्या जागेचा भूखंड क्र. ५ व ६ चा (सुमारे साडेसात एकर जागा) समावेश होता.२००४ मध्ये घुमरे यांनी सर्व जागेचे प्लॉटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेकडे अर्जही दाखल केला; पण स्टुडिओच्या जागेमुळे रेखांकनाला परवानगी मिळत नव्हती. त्यानंतर आर्थिकद़ृष्ट्या परवडत नसल्याचे कारण सांगून देवासच्या महाराजांनी जानेवारी २००८ मध्ये शालिनी सिनेटोन हा स्टुडिओ बंद केला. १५ एप्रिल २००८ रोजी स्टुडिओची ऐतिहासिक वास्तू पाडण्यात आली. त्यावर कलाप्रेमींतून तीव— संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलन झाले. या आंदोलनामुळे घुमरे यांना शालिनी स्टुडिओ जागेतील परिसराचा विकास करता येत नव्हता. त्यांनी क्र. ५ व ६ चा भूखंड हा शालिनी सिनेटोनसाठी आरक्षित राहणार असल्याचे अ‍ॅफेडेव्हिट करून दिले. या अ‍ॅफेडेव्हिटनंतरच शालिनी स्टुडिओ परिसरातील जागेच्या रेखांकनास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे चित्रपट कलाकारांनी समाधान व्यक्त केले. निर्मात्यांनी किमान रिकाम्या जागेवर तात्पुरते फ्लोअर उभारून चित्रीकरणाचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात घुमरे यांनी नगरविकास खात्याकडे अपील करून स्टुडिओ जागेवरही प्लॉटिंग (रेखांकन) करण्याची मागणी केली. नगरविकास खात्याने महापालिकेला याबाबत बाजू मांडण्यास सांगितले. महापालिकेची बाजू ऐकल्यानंतर तत्कालीन नगरविकासमंत्र्यांनी विकसकाला रेखांकनाची मंजुरी दिली.

कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने राज्य शासनाने १७ एप्रिल २०१५ मध्ये हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीची स्थापना केली आहे. कमिटीच्या १३ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित मिळकतीवर शालिनी सिनेटोनखेरीज अन्य वापर करता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. 

तसेच १२ जून २०१७ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र शासनास हेरिटेज स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत कळविण्याचा निर्णय झाला आहे. तसेच हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या बैठकीत ए वॉर्ड कसबा करवीर रि.स.नं. ११०४ पै. भूखंड क्र. ५ चे क्षेत्र ६३१०.६० चौ. मी., भूखंड क्र.६चे क्षेत्र १६१०१.०० चौ.मी. या क्षेत्रफळाची जागा ऐतिहासिक परिसर म्हणून ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादीत ग्रेड-३ यामध्ये समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.तरीही या जागेवकर रेखांकनास मंजुरी देण्यात आली आहे.

अनेक चित्रपट निर्मितीच्या साक्षीदाराचे अस्तित्व संपले..

चित्रपटपंढरी म्हणून ओ?ळखल्या जाणार्‍या कोल्हापुरात शालिनी स्टुडिओ व जयप्रभा स्टुडिओे हे कोल्हापूरचे मानबिंदू होते. १९३३ मध्ये शालिनी सिनेटोनची स्थापना झाली. त्यावेळेपासून या स्टुडिओमध्ये मराठीबरोबरच तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी भाषिक अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मात्र, या साक्षीदाराचे अस्तित्व आता संपले आहे.

प्रस्ताव नाकारण्याची कारणे…

शासनाने कलम ३७ (2) अन्वये हेरिटेज नियमावली व यादीस २९ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या अधिसूचनेअन्वये मंजुरी देताना, शालिनी सिनेटोन ही मिळकत ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादीतून वगळली आहे. त्यामुळे याप्रकरणी कोल्हापूर महापालिकेच्या प्रमाणिक विकास नियंत्रण नियमावलीनुसार योग्य ती कार्यवाही करावी, असेही शासनाने ६ मे 2013 रोजी पत्रान्वये कळविले आहे.

प्रस्तावामध्ये उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. 12204/2015 मध्ये ५ डिसेंबर २०१६ रोजीच्या निकालात संबंधित जागेवरील हेरिटेज वास्तू शासनाने यादीस मंजुरी देताना वगळल्याबाबत व अन्य बाबींचा उल्लेख करून त्याप्रमाणे महापालिकेला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन कलम ४७अन्वये अपील प्रस्तावात तत्कालीन राज्यमंत्री (नगरविकास) यांनी अपील मान्य केले आहे. त्यानंतरही महापालिका अर्जदारांना रेखांकन परवानगी देत नसल्याचे दिसत आहे. शालिनी सिनेटोनची मिळकत हेरिटेज स्थळांच्या यादीतून शासनाने पूर्वीच वगळली असल्याने तसेच सद्यस्थितीत या जागेवर शालिनी सिनेटोन या वापराच्या अनुषंगाने कोणतीही वास्तू अस्तित्वात नसून जागा मोकळी आहे. पुन्हा जागा हेरिटेज स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचे प्रयोजन समजून येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news