

मुंबई - छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा बहू प्रतीक्षित चित्रपट छावा आज व्हॅलेंटाईनच्या दिवशी प्रदर्शित झाला. चित्रपट पाहण्यास प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून येतेय. अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचं दिसून येत आहे. अभिनेता विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसूबाई यांची भूमिका दमदार साकारली असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये १७ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचे संकेत पहिल्याच दिवशी मिळत आहे. विशेषता तरुण-तरुणी हा चित्रपट बघायला विशेष पसंती देत असल्याचं बघायला मिळत आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील दुपारी दीडच्या चित्रपटाच्या शोला कुटुंबीयांसह, लहानग्यांसह तरुण-तरुणींनी विशेष गर्दी केल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे प्रेमाचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या "व्हॅलेंटाईनच्या दिवशी " प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाला प्रेक्षकांचं अजून किती प्रेम मिळतं? हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
नागपूर-
पंचशील सिनेमागृहात छावा हा सिनेमा पाहण्यासाठी चक्क संभाजी महाराजांची वेशभूषा साकारून घोड्यावरून एक तरुण पोहचला. आज हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या उत्साहाने प्रेक्षकांनी गर्दी केली.