

एकीकडे वैयक्तिक आयुष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा, तर दुसरीकडे व्यावसायिक पातळीवर एक मोठी झेप... अभिनेत्री आणि दिग्दर्शिका तनिष्ठा चॅटर्जी सध्या अशाच एका विलक्षण प्रवासातून जात आहेत. त्यांच्या ‘फूल प्लेट’ या आगामी चित्रपटाची निवड प्रतिष्ठित ‘बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025’ मध्ये वर्ल्ड प्रीमियरसाठी झाली आहे.
कीर्ती कुल्हारी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोषणा करताना तनिष्ठा यांनी आपला कर्करोगाशी सुरू असलेला लढा आणि चित्रपटनिर्मितीचा खडतर प्रवास एका भावनिक पोस्टमधून उलगडला आहे. मंगळवारी सोशल मीडियावर चित्रपटाचे दोन पोस्टर्स शेअर करत तनिष्ठा यांनी ही आनंदाची बातमी दिली. या पोस्टर्समध्ये कीर्ती कुल्हारी बुरखा घातलेल्या भूमिकेत दिसत आहेत. आपल्या पोस्टमध्ये तनिष्ठा लिहितात, एका अत्यंत कठीण वैयक्तिक प्रवासाच्या मध्यभागी ‘मी माझा ‘फूल प्लेट’ हा चित्रपट पूर्ण करू शकले.
या चित्रपटाच्या पोस्ट-प्रोडक्शनदरम्यान मला स्टेज 4 कर्करोगाचे निदान झाले; पण या सगळ्या परिस्थितीतही ‘फूल प्लेट’चा वर्ल्ड प्रीमियर बुसानमध्ये होणार आहे, हे सांगताना मला प्रचंड आनंद होत आहे.’ संघर्षातून साकारलेली कलाकृती ‘फूल प्लेट’ हा चित्रपट केवळ एक कलाकृती नसून संपूर्ण टीमची जिद्द आणि वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे तनिष्ठा सांगतात.