

ertainment bollywood bajrang dal burns aamir khan putla against third marriage with gauri spratt
पुढारी ऑनलाईन : अभिनेता आमिर खानने नुकतेच गौरी स्प्रॅटसोबत तिसरे लग्न केल्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये बजरंग दलाने तीव्र विरोध दर्शवला आहे. हिंदू मुलीशी विवाह केल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमिर खानचा पुतळा जाळला आणि त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली.
बिहारमधील फारबिसगंज येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या विवाहाविरोधात आंदोलन केले. या वेळी त्यांनी अभिनेत्याचा पुतळा जाळत त्याच्यावर 'लव्ह जिहाद'चा आरोप केला. आंदोलनादरम्यान "आमिर खान मुर्दाबाद" आणि "आमिर खान जिहादी, भारत सोडा" अशा घोषणाही देण्यात आल्या.
बजरंग दलाचे नेते मनोज सोनी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, "आमिर खान हिंदू समाजातील मुलींशी लग्न करून हिंदू समाजाचा अपमान करत आहे." त्यांनी पुढे आरोप केला की, "मोठ्या कटाचा भाग म्हणून तो हिंदू समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे." तसेच, "त्याने अशा कृती थांबवल्या नाहीत तर त्याला धडा शिकवला जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
बजरंग दलाने आमिर खानचा पुतळा जाळला
'ऑलवेज बॉलिवूड'ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मनोज सोनी म्हणाले, "लग्न हिंदू मुलीशी करायचे आणि मुलांना तैमूर, अफरोज, सलमान अशी नावे द्यायची, हा कसला नियम आहे? त्यांना मुस्लिम समाजातील मुलींवर प्रेम का होत नाही? नेहमी हिंदू मुलींवरच प्रेम का होते? आमिर खान सतत हिंदू मुलींशी लग्न करून हिंदू समाजालाच आव्हान देत आहे."
आमिर खानवर देश कमकुवत करण्याचा आरोप
सोनी पुढे म्हणाले, "आमिर खान मोठ्या षड्यंत्राचा भाग म्हणून हिंदू समाजाला कमकुवत करण्याचे काम करत आहे. तो सतत हिंदू समाजाची बदनामी करत असून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे." त्यांनी न्यायालय आणि सरकारकडे आमिर खानविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
आमिर खानची तीन लग्ने
आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी पहिले लग्न केले होते. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने चित्रपट निर्माती किरण राव यांच्याशी विवाह केला. मात्र, 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले. अलीकडेच आमिरने मुंबईतील आपल्या निवासस्थानी गौरी स्प्रॅटसोबत विवाह केल्याचे वृत्त समोर आले आहे.
कोण आहेत गौरी स्प्रॅट?
वृत्तांनुसार, गौरी स्प्रॅट यांच्या आई तमिळ वडिलोपार्जित कुटुंबातील असून वडील आयरिश वंशाचे आहेत. त्यांच्या आजोबांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. गौरी यांचे हेअरड्रेसिंग क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण असून त्यांनी लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स येथून फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये एफडीए पदवी प्राप्त केली आहे. त्या सहा वर्षांच्या मुलाच्या आई आहेत. त्यांच्या पहिल्या पतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. सध्या त्या आमिर खान यांच्या निर्मिती संस्थेत, आमिर खान फिल्म्समध्ये कार्यरत आहेत.