

मुंबई : बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा टप्पा पार करून धुमाकूळ घालणार्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटासमोर आता कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. चित्रपटातील एका पोस्टरमुळे शिख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत, शिख्स इन महाराष्ट्र या संघटनेने अभिनेता रणवीर सिंह आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबईतील मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार संघटनेच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये अभिनेता रणवीर सिंह याने पगडी, लांब दाढी आणि हातात कडे घातलेले दाखवले आहे. ही सर्व शिख धर्माची पवित्र चिन्हे आहेत. मात्र, याच रुपात रणवीरच्या हातात सिगारेट देखील दाखवण्यात आली आहे. शिख धर्मात अमली पदार्थ किंवा धूम्रपानाला कडक मनाई असल्याने, अशा प्रकारच्या चित्रणामुळे समुदायाच्या भावनांना खोलवर ठेच पोहोचली असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. ही तक्रार मुलुंड पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आहे. ‘कलेच्या नावाखाली कोणत्याही धर्माच्या पवित्र चिन्हांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. चित्रपटाच्या पोस्टरमधील तो आक्षेपार्ह भाग तातडीने हटवावा आणि संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी शिख्स इन महाराष्ट्र संघटनेने केली आहे.
'धुरंधर: द रिव्हेंज' पेड प्रीव्ह्यूजसह पहिल्यादिवशी १४५ कोटींची दणदणीत ओपनिंग केली. ६ व्या दिवशी 'धुरंधर: द रिव्हेंज'ने देशभरात ५६.५५ कोटींची निव्वळ कमाई (नेट कलेक्शन) केली. यामुळे चित्रपटाची एकूण भारतातील ग्रॉस कमाई ६८७.४३ कोटींवर पोहोचली असून निव्वळ (नेट) कमाई ५७५.६७ कोटी इतकी झाली आहे. परदेशात या चित्रपटाने आतापर्यंत २३१.५७ कोटींची ग्रॉस कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाची एकूण जागतिक (वर्ल्डवाइड) कमाई ९१९ कोटींवर पोहोचली आहे.