मुंबई : पुढारी ऑनलाईन
संगीतकार नरेंद्र भिडे ( narendra bhide) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. अनेक मराठी चित्रपटांची गाणी त्यांनी संगीतबध्द केली होती. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे.
भिडेंनी सिव्हिल इंजिनिअरमधून शिक्षण पूर्ण केलं होतं. परंतु, संगीताची आवड असल्याने पॅशन म्हणून ते या क्षेत्रात उतरले. त्यांनी कॉमेडी ड्रामा घोस्ट (२०१५), थ्रीलर ड्रामा देऊळबंद (२०१५), बायोस्कोप (२०१५), रोमँटिक कॉमेडी चि. व. सौ. का. (२०१७) या चित्रपटांना संगीत दिले. तर यामध्ये अलीकडील चित्रपट हम्पी (२०१७), उबंटू (२०१७), लेथ जोशी (२०१८), पुष्पक विमान (२०१८) आणि ६६ सदाशिव (२०१९) या चित्रपटांचा समावेश आहे. अवंतिका, ऊन पाऊस, नुपूर, श्रावणसरी, कितीतरी दिवसांनी आज, त्या पैलतिरावर मिळेल मजला ही त्यांची आठवणीतील गाणी गाजली होती.
पार्थिवाचे अंत्यदर्शन सकाळी साडेनऊ वाजता डॉन स्टुडिओ येथे ठेवण्यात येणार आहे. तर ११ वाजता वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.