

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘ऐका दाजिबा’ म्हणत सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अतिशय लोकप्रिय गायिका वैशाली सामंत सध्या सर्वत्र चर्चेत आहे ते म्हणजे, सध्या सर्वत्र गाजत असलेल्या 'छावा' चित्रपटातील गाणं 'आया रे तूफान' साठी. वैशालीने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. पण यावेळी त्यांनी अक्षरशः सूरांची जादू दाखवत छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाईंवर म्हणजे, विकी कौशल आणि रश्मिका मंदानावर चित्रित या गाण्यानी सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. गाण्याबद्दलची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, ए. आर. रहमानसोबत गायिका वैशालीला डूएट गाण्याची सुवर्ण संधी मिळाली. रहमान यांचा आवाज जादुई आहेच, पण वैशालीचा आवाज अंगावर रोमांच उभे करतो.
'छावा' या चित्रपटाची गाणी खूपच गाजत आहे. 'आया रे तूफान' रिलीज होताच काही तासांमध्ये युट्युबवर या गाण्याने लाखो व्ह्युज मिळवले. प्रत्यक्षात हे गीत पाहताना मन अभिमानानं भरून येत आहे. मराठमोळी गायिका वैशालीने आपल्या सुरेल आवाजाने गाण्याची शोभा वाढवली आहे.
ऑस्कर विनिंग संगीतकार ए. आर. रेहमानसोबत गाण्याची संधी मिळाली म्हणून वैशालीनी आभार व्यक्त करताना आपलं मत मांडले आहे. यावेळी ती म्हणाली की, 'छावा चित्रपटाचं हे गाणं ए.आर.रहमान सरांसोबत रेकॉर्ड करताना मला खूप काही शिकायला मिळालं, माझ्यातल्या गायिकेवर विश्वास दाखवला हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. ऑडिओ लाँन्चच्या दरम्यान मला प्रत्यक्ष त्याच्यासोबत गाता आलं ही खूप मोठी संधी होती. त्यामुळे मी ए.आर.रहमान सरांचे आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांचे मनःपूर्वक आभार मानते. "
ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं इर्शाद कामिल आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलं आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना या दोघांवर हे गाणं चित्रित केलं गेलंय. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.
'भगवे कि शान में चमका आसमान, आया आया आया रे तुफान!' खरंच या गाण्याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि वैशाली सामंतचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे आजवर गायलेल्या गाण्यांपैकी वैशालीचं "आया रे तूफान" हे गाणं इंडस्ट्रीसाठी आणखी एक अनमोल देणगी ठरली आहे हे नक्की.