मुंबई : पुढारी ऑनलाईन
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये ती तिचा संपूर्ण वेळ कुटुंबाला देत आहे. उर्मिलाला सतत काहीतरी शिकत राहायला फार आवडते. उर्मिला ही उत्तम नृत्यांगना आहे हे आपणास माहित आहे. लॉकडाऊनमध्येही ती नृत्यांगणाचा आनंद घेत आहे. तिने बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण 'एरिअल सिल्क' हा नृत्यप्रकार शिकणारी ती पहिलीच मराठी अभिनेत्री आहे. आज वाढदिवसानिमित्त तिच्या या छंदाविषयी आपण अधिक जाणून घेऊया.
काही दिवसांपूर्वी तिच्या या एरिअल सिल्क फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. या फोटोशूटसाठी उर्मिला तब्बल ५ तास हवेत लटकत होती. या फोटोशूटसाठी तिने व्यवस्थित ट्रेनिंग घेतले होते. त्यानंतर हे फोटोशूट करण्यात आले होते. उर्मिलाला या नृत्य प्रकाराचे ट्रेनिंग फिटनेस ट्रेनर अदिती देशपांडे हिने दिले होते.
अशी झाली एरिअल सिल्क शिकण्यास सुरुवात..
उर्मिला कानिटकरची जवळची मैत्रीण फुलवा खामकरची मुलगी आदिती देशपांडे यांच्याकडे हा डान्सप्रकार शिकायला जायची. तिला तो डान्सप्रकार करताना पाहून उर्मिला आदितीला बोलून गेली, 'मलाही माझ्या आईवडिलांनी असे काही शिकविले असते तर मीसुद्धा असे परफॉर्म करु शकली असती.' त्यानंतर आदितीने उर्मिलाला प्रोत्साहित केले आणि नंतर उर्मिलाने नृत्याचे धडे घेण्यास सुरुवात केली.
एरिअल सिल्क हा प्रकार काय आहे
उर्मिला ही 'एरिअल सिल्क' हा नृत्यप्रकार शिकणारी पहिलीच मराठी अभिनेत्री आहे. दोरीच्या मल्लखांबाप्रमाणे सिल्कच्या कापडाचा वापर करून सादर करण्यात येणारा हा खास प्रकार आहे. दोरीऐवजी सिल्कच्या कापडाला धरून लयबद्ध हालचाली करणे हे यातील विशेष कौशल्य असते.
उर्मिला आणि नृत्य
उर्मिलाचा जन्म ४ मे १९८६ ला पुण्यात झाला होता. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड असल्यामुळे तिने प्रसिद्ध कथ्थक गुरु आशा जोगळेकर यांच्याकडे कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. यासोबतच तिने तिच्या नृत्याची आवड ही चांगल्या पद्धतीने जपली आहे. उर्मिलाने ओडिसी नृत्यशैलीचे शिक्षण सुजाता महापात्रा यांच्याकडून घेतले आहे. गांधर्व महाविद्यालयाची नृत्यालंकार ही पदवी तिने प्राप्त केली आहे. 'श्रुंगारमणी' हा किताबसुद्धा तिला मिळाला आहे. ती अनेकदा तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो.
अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्याला नेहमीच भेटणारी उर्मिलााने 'शुभमंगल सावधान', 'आईशप्पथ', 'दुनियादारी', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. यासोबतच मराठी मालिका 'असंभव', 'गोष्ट एका लग्नाची' यामध्येही तिने काम केले आहे. तर 'मायका', 'मेरा ससुराल' या हिंदी मालिकांमध्ये ती दिसली आहे.