

खरं तर ग्रामीण भाग, दुष्काळ, शेतकर्यांच्या व्यथा यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले आहेत. त्यात गाईचे ओघवते दर्शन घडले असेल. पण गाईसारख्या तेही भाकड गाईसारखा विषय घेऊन त्यावर दिग्दर्शकाने सरळधोपट चित्रपट तयार केला नाही तर गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात, ही श्रध्दा घेऊन जगणार्या समाजाच्या सगळ्या व्यवस्थांची ‘जित्राब’मध्ये चिरफाड केली आहे.
जनावरांच्या बाजारात दुष्काळग्रस्त शेतकरी नामदेव अप्पा (सुहास पळशीकर) त्याची भाकड गाय विकायला घेऊन आला आहे. पण त्या गाईला गिर्हाईक मिळत नाही. नामदेवच्या आईचे या गाईवर (राणी) जीवापाड प्रेम आहे. आई मरताना गाईला विकू नको, ब्राह्मणाला दान कर, असे वचन घेते. त्यानुसार गावातल्या देवा ब्राह्मणाला (भरत गणशपुरे) गाय दान दिली जाते. ही गाय भाकड आहे असे समजल्यावर ती परत नामदेवाच्या घरच्या दावणीला येते. त्यानंतर त्या गाईच्या वाटेला भाकड म्हणून आलेल्या वनवासाचे वास्तव चित्रण चित्रपट करतो.
गाईच्या नावाने या देशात धार्मिक आणि राजकीय दंगली घडल्या आहेत, पण गाईला देव मानणारा समाज भाकड गाईला व्यवस्थेतून कसं दूर करतो, गाईवर आई एवढंच प्रेम करणार्या शेतकर्याची तिला जगविण्यासाठीच्या धडपडीचे चित्रण दिग्दर्शकाने केले आहे. समाजव्यवस्थेची नाळ माहिती असलेल्या अरविंद जगताप हे या चित्रपटाचे लेखक आहेत.
व्यवस्थेवर नेमक बोट ठेवण्याचे काम त्यांच्या कथेइतकेच दिग्दर्शकाने समर्पकपणाने केले आहे. गाईच्या नावावर पेटलेल्या दंगली चित्रपटाच्या कथेत सहज घुसडून चित्रपटाला बटबटीत रूप देता आले असते, पण तो मोह या चित्रपटात दिग्दर्शकाने टाळला आहे. उलट भाकड जनावरांचे करायचे काय, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत परिस्थितीमुळे नामदेवसारखा शेतकरी कसा पोहचते, हे चित्रपटात पाहण्यासारखे आहे.
ग्रामीण भागात प्रकर्षाने दुष्काळात भाकड गाईंचा प्रश्न ऐरणीवर येतो. हा ज्वलंत विषय विधानसभेत गाजतो. एवढेच कशाला हिंदू संस्कृतीत पवित्र मानल्या गेलेल्या गाईंना कत्तलखान्यात जाण्यापासून रोखणार्या तथाकथित संस्कृती रक्षकांचे बुरखेही जित्राबच्या अनुषंगाने उघडे झाले आहेत.
या चित्रपटात सर्वच कलाकारांनी अतिशय संयत आणि चोख अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या कथेला प्रेमाच्या त्रिकोणाची जोड आहे, गाईसारख्या ज्वलंत विषय आहे, पण चित्रपटात एकही हाणामारीचे दृश्य नाही, गाणीही कथेला समर्पक आहेत.
चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिके पटकावली आहेत. महानगरात चौकाचौकांत गाईला पैसे देऊन घास घालणार्या आणि तथाकथित गोरक्षकांनी आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे.