

अनुपमा गुंडे
कोणतेही नाते प्रेम आणि विश्वासाच्या बळावर फुलते. पण जेव्हा प्रेमावर अधिकार स्वार होतो, आणि विश्वासा आडून संशय बळावतो, तेव्हा त्या नात्याला सुरूंग लागायला सुरवात होते. आजच्या झट मंगनी पट शादीच्या जमान्यात पती-पत्नीच्या नात्यात अधिकार आणि हक्काचा अतिरेक होत असल्याने एवढ्याच वेगाने घटस्फोटही होतात.
हिंदू संस्कृतीत ‘बेटर हाफ’ म्हणजे सहचारी, जोडीदार, तर पत्नीला अर्धांगिनी म्हणतात. त्याच अर्धांगिनीची आणि तिच्या बेटर हाफ अर्थात पतीची बाजू मांडण्याचा प्रयत्न बेटर हाफ चित्रपटात दिग्दर्शकाने केला आहे. अजय (सुबोध भावे) हा एक लेखक आहे. त्याची कथा पडद्यावर येण्यासाठी तो धडपडत असतो. या धडपडीच्या प्रवासातच त्याची रंगभूषाकार सोनियाशी (रिंकू राजगुरू) ओळख होते. ओळखीचे रूपांतर प्रेमात होते आणि सोनियाच्या आग्रहाखातर दोघांच्याही घरच्याचा विरोध पत्करून दोघे लग्न करतात. पण लग्नानंतर दोघांचे दिवस पालटतात. अजयला मोठ्या जाहिरात कंपनीत कॉपी रायटर म्हणून नोकरी मिळते, तर सोनियाचा रंगभूषाकार म्हणून प्रवास सुरू राहतो.
अजय सोनियापेक्षा विवाहाच्या वयोमानापेक्षा जास्तच मोठा आहे. त्यामुळे तो आपल्यापासून दूर जाऊ नये, यासाठी सोनिया मी सांगेल त्याच रंगाचे कपडे घालायचे, तोच आहार घ्यायचा, अशी अधिकारवाणीने वागू लागते. महिला बॉसशी त्याचे संबंध आहेत, असा संशय ती घेते. अजय सुरुवातीला प्रेमापोटी पत्नी म्हणून तिला जाणवणारी असुरक्षितता, तिची हुकूमत समजून घेतो. मात्र, तिच्या अविवेकी प्रेमात माणूस म्हणून तो गुदमरू लागतो. तेव्हा अशाच एका प्रसंगात त्याचा बांध फुटतो आणि त्या भांडणात या नात्याला वेगळं वळण मिळते. या अर्धांगिनीची पुढची गोष्ट पडद्यावर पाहण्यातच मजा आहे.
सुबोध भावे यांनी प्रौढ पण समंजस आणि नात्यात घुसमट झालेला अजय ताकदीने उभा केला आहे. रिंकू राजगुरूने अल्लड प्रेयसी ते पत्नी असा प्रवास रंगवला आहे. अजयमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतलेली बॉस आणि नंतरची प्रेयसीची भूमिका प्रार्थना बेहेरे संयतरित्या साकारली आहे. अनिकेत विश्वासरावचा मित्ररूपी पडद्यावरचा वावर लक्षात राहण्यासारखा झाला आहे. पती-पत्नीच्या नात्यातील वीण घट्ट करण्यासाठी पाहावा असा हा चित्रपट आहे.