मुंबई : पुढारी ऑनलाईन
कलामहर्षी बाबुराव पेंटर यांची आज पुण्यतिथी. बाबुराव पेंटर यांचा जन्म ३ जून, १८९० मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले. पहिला स्वदेशी कॅमेरा तयार करत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी स्वदेशी बनवली. आजकाल सेन्सॉरशिप या शब्दाचा मोठा गाजावाजा होत असतो. सेन्सॉरशिप बाबतीतही त्यांचे नाव अग्रणीच आहे. भारतीय चित्रपसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदा ज्या चित्रपटास सेन्सॉरशिप लागली तो बाबुराव पेंटरांचाच चित्रपट होता.
सेन्सॉरशीपची सुरुवात
सध्या सर्वत्र सेन्सॉरशिप हा शब्द नेहमी गाजत असतो. मात्र या शब्दाची मूळ सुरुवात नेमकी केव्हा झाली ठाऊक आहे का? भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सेन्सॉरशीपला सुरुवात कशी झाली, ती कोठून झाली, याची माहिती बहुतेक जणांना माहिती नसेल. बाबुराव पेंटर आणि सेन्सॉरशीपचा थेट संबंध आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सेन्सॉरशीपची सुरुवात झाली ती प्रसिध्द शिल्पकार, चित्रकार बाबुराव पेंटर यांच्या स्त्री पात्रे असलेल्या पहिल्या चित्रपटापासून. त्याकाळी स्त्रीने चित्रपटात काम करणं म्हणजे, भलतचं काहीतरी होतं. पण, हे धाडस दाखवलं, पेंटरांनी. स्त्रीपात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला, तो म्हणजे 'सैरंध्री'. पुण्यातील 'आर्यन' थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे.
सैरंध्री हा सिनेमा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या प्रसिध्द कीचकवध या नाटकावर आधारित होता. ब्रिटिश सरकारचे यावर राग होते. कारण, या नाटकातून तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झनच्या अन्याय-जुलूमावर टिका केली होती आणि कर्झनचा किचकप्रमाणे वध करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन तरुणांना करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ब्रिटिश सरकारला हे समजल्यानंतर त्यांनी नाटकावर बंदी घातली होती. या नाटकातील किचकवधाचे दृश्ये हटवण्यास सांगण्यात आली. त्यामुळे सेन्सॉरमुळे दृश्यांमध्ये काटछट करण्यात आलेला हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट होता, असे म्हटले जाते. पुढे मुंबई, कोलकाता येथे सेन्सॉरबोर्ड स्थापन करण्यात आले. आता सेन्सॉरबोर्डाच्या हाताखालूनच अनेक चित्रपटांच्या दृश्यांमध्ये काटछाट होते.
महाराष्ट्र फिल्म कंपनी
पेंटरांनी १ डिसेंबर, १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली होती. महाराष्ट्र फिल्म कंपनी च्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली 'सावकारी पाश' हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. १९२० ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी झाली. याच चित्रपटाचे शूटिंग पहिल्यांदाच आऊटडोर करण्यात आलं होतं. पन्हाळ्यावर सिंहगडावरच्या लढाईचा सेट उभारून तेथे शूटिंगसाठी रात्रीचा प्रकाशझोत तयार करण्यात आला होता. चित्रपट पाहण्यासाठी उसळलेली गर्दी पाहून त्याचे नियंत्रण सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटापासूनच करमणूक कर सुरू करण्यात आला होता.
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळक्यांनी घातला असला, तरी बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून दिले. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही. शांताराम, एस. फत्तेलाल, विष्णुपंत दामले व केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालविला.
वत्सलाहरणाच्या निर्मितीनंतर पेंटरांनी मार्कंडेयाचे शूटिंग सुरू केले. परंतु, ६ नोव्हेंबर, १९२२ रोजी शूटिंगच्या वेळी चित्रपट निर्मितिगृहाला आग लागली. आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यानंतरही, चित्रपटसंसार बाबूरावांनी उभा केला व चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली.
कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुराव पेंटरांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. असे हे कलातपस्वी असणारे व्यक्तिमत्व आजच्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी १९५४ रोजी स्वर्गवासी झाले.