बँकेत नोकरी करणारे अशोक सराफ चित्रपटात कसे आले? 

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ यांचा आजदेखील टीव्हीवर चित्रपट लागला की, प्रेक्षक अजुनही त्यांना पाहण्याची संधी गमावत नाहीत. त्यांचा 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट असो वा 'बिनकामाचा नवरा; टीव्हीचा रिमोट त्या चित्रपटाजवळ येऊन थांबतोचं. अशोक सराफ सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. अनेक दर्जेदार आणि सरस चित्रपटात काम केलेले अशोक चित्रपटात येण्यापूर्वी बँकेत नोकरी करायचे. ते चित्रपटात कसे आले माहिती आहे का? तर मग, चला त्यांच्या सिनेप्रवासाविषयी जाणून घेऊया. 

वाचा- Happy Birthday Ashok Saraf : अशोक सराफ यांना मामा नाव कसे पडलं?

गंभीर भूमिकांबरोबरच विनोदी चित्रपटात सहज अभिनय साकारणारा अभिनेता म्हणून त्यांची ख्याती. काही चित्रपटांतूनही ते खलनायकाच्या भूमिकेतही दिसले. परंतु, गंभीर आणि खलनायकांच्या भूमिकांपेक्षा त्यांच्या विनोदी भूमिका मात्र अधिक गाजल्या. दिसायला फारसे सुंदर नसले तरी बोलण्याची विशेष लकब आणि दमदार आवाजाने अशोक मामा यांची ओळख एक विनोदी कलाकार म्हणून कायमची सिनेसृष्टीवर उमटली. 

मुंबईत जन्मलेले अशोक सराफ मुळचे बेळगावचे आहेत. पण, त्यांचा जन्म ४ जून, १९४७ रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपणही तेथेच गेले. आज अशोक सराफ ७४ वर्षांचे झाले. तरीही, ते जणू तरुण अभिनेता असल्याचा भास आपल्याला आजही होतो. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून अद्यापही त्याचे वलय सिनेप्रेमींच्या आणि चाहत्यांभोवती निर्माण करणारे ते 'अशोक मामाचं' होय. आपल्या वयापेक्षाही कमी अभिनेत्रींसोबत अभिनय जमवून घेणे आणि त्या-त्या भूमिकेत परफेक्ट बसण्याचे कौशल्य फक्त त्यांच्याकडेच आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

अशोक सराफ यांनी शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण त्यांच्या ध्यानीमनी मात्र फक्त अभिनयच होता. यावर उपाय म्हणून त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. अशोक सराफ यांच्या वडिलांचा इम्पोर्ट- एक्सपोर्टचा व्यवसाय होता. मुलाने चांगली नोकरी धरल्याचा त्यांना आनंद होता. पण, अशोक यांना अभिनयात आवड होती. म्हणूनचं नोकरी करत असताना त्यांनी नाटकात काम करायला सुरूवात केली. तब्बल १० वर्ष बँकेत नोकरी करता करता त्यांनी आपला अभिनय सुरूचं ठेवला. 

विदूषकाच्या भूमिकेतून सुरुवात

छोट्या पडद्यावर येण्यापूर्वी रंगभूमीवरील त्यांचं सादरीकरण 'अफलातून'च आहे. तर संगीत नाटकातीलही त्यांच्या भूमिकांचे कौतुक करावं लागेल. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे रंगभूमीवर सादरीकरण केले. वि. वा. शिरवाडकरांच्या 'ययाती आणि देवयानी'ची कथेच्या सादराकरणात अशोक सराफ एक प्रतिभावंत कलावंत म्हणून उतरले. 'ययाती' आणि 'देवयानी' नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका साकारली होती. याच भूमिकेपासून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. यानंतर १९७१ मध्ये आलेला 'दोन्ही घरचा पाहूणा' या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली.   

पांडू हवालदारने दिली ओळख-

१९७५ मध्ये आलेल्या दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'ने अशोक सराफ यांना ओळख मिळवून दिली. यानंतर त्यांनी 'करण अर्जुन' 'येस बॉस', 'जोरू का गुलाम' या चित्रपटांत काम केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.  

सौदामिनी आधी कुंकू लाव…

अशोक यांनी १९६९ मध्ये जानकी चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. सुरूवातीला निळू फुलेंच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली. 'फटाकडी', 'मोसंबी नारंगी', 'गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं', 'सासुरवाशीन', 'बिन कामाचा नवरा', 'कळत नकळत', 'माझा पती करोडपती' यांसारख्या चित्रपटांमध्ये निळू आणि अशोक यांच्या जोडीने धमाल उडवून दिली. माझा पती करोडपतीमध्ये सौदामिनी रणगाडे अर्थातचं सुप्रिया पिळगावकरचा खोटा नवरा बाजीराव रणगाडेची भूमिका साकारून धमाल उडवून दिली. याचं चित्रपटातील अशोक यांचा एक डायलॉग 'सौदामिनी आधी कुंकू लाव' लोकप्रिय ठरला. तर बिनकामाचा नवरामध्ये अभिनेत्री रंजनाच्या पतीची भूमिका त्यांनी साकारली होती. काहीही काम न करता गाव हुंदडणारा आणि बायकोला शेंड्या लावणारा बिनकानाचा नवरा (अशोक सराफ) चांगलाचं गाजला. 

अशोक सराफ यांनी अडीचशेहून अधिक चित्रपट गाजवले. 'दोन्ही घरचा पाहुणा', 'जवळ ये लाजू नको,' 'तुमचं आमचं जमलं,' 'दिड शहाणे', 'हळदी कुंकू', 'दुनिया करी सलाम', 'पांडू हवालदार', 'कळत नकळत', 'भस्म', 'वजीर', 'चौकट राजा', 'अशी ही बनवा बनवी,' 'गोंधळात गोंधळ,' 'बिन कामाचा नवरा,' 'लपंडाव,' 'एक डाव भुताचा,' 'आम्ही सातपुते' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. 'नवरी मिळे नवऱ्याला',' आत्मविश्वास', 'गंमत जंमत', 'आयत्या घरात घरोबा'पासून, 'शुभमंगल सावधान', 'आई नंबर वन' व 'एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर' यांसारख्या चित्रपटांसून वेगळ्या भूमिका साकारल्या.

नायक असो वा खलनायक, प्रेमळ वा कडक भूमिका असो, अभिनयाच्या प्रत्येक चौकटीत अशोक बसले. म्हणूनचं, त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अभिनेत्रींसोबत त्यांची असंख्य चित्रपटांमध्ये जोडी जमली. अभिनेत्री उषा चव्हाण, सुष्मा शिरोमणी, रंजना, वर्षा उसगावकर, रेखा राव, आश्विनी भावे, निवेदिता जोशी, रिमा लागू, अलका कुबल, सुप्रिया पिळगावकर अशा हरहुन्नरी अभिनेत्रींसोबत अशोक यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी हम भी किसीसे कम नहीं हे दाखवून दिले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news