मुंबई : पुढारी ऑनलाईन
'द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये (इफ्फी- International Film Festival of India) होणाऱ्या चित्रपटांची निवड हा नेहमीच चित्रपटकर्मीसाठी औत्सुक्याचा विषय असतो. यंदाच्या ५१व्या 'इफ्फी' चित्रपट महोत्सवामध्ये 'इंडियन पॅनारोमा फिचर फिल्म २०२०' च्या विभागात शशांक उदापूरकर दिग्दर्शित व अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अभिनयाने नटलेल्या 'प्रवास' या चित्रपटाची निवड झाली आहे.
'प्रवास'ची निवड 'इफ्फी' या मानाच्या महोत्सवात होणे ही आमच्यासाठी बहुमानाची गोष्ट असल्याचे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी सांगितले. आनंददायी प्रवासाची गोष्ट सांगत आयुष्याचे मर्म सांगणारा अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे अभिनीत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. 'इफ्फी'मध्ये सुद्धा हा चित्रपट आपला वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वास या चित्रपटाचे निर्माते ओम छंगानी यांनी व्यक्त केला.
आयुष्यातील प्रत्येक लढाई निर्धाराने लढण्यातच खरी मजा असते, हाच खरा 'प्रवास' असतो हा विचार नकळतपणे देणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती 'ओम छंगानी फिल्म्स' यांची आहे. अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत या चित्रपटात विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदी कलाकार आहेत.