

Asha Bhosle Piya Tu Ab To Aaja Dhurandhar movie song
मुंबई : 'पिया तू अब तो आजा'... हे गाणं कानावर पडताच आजही डोळ्यांसमोर उभी राहते ती हेलन यांची अदाकारी आणि आशा भोसले यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज. १९७१ मधील 'कारवा' चित्रपटातील हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. नुकतेच आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटात या गाण्याचे रिमिक्स वापरण्यात आले असून, या गाण्याने पुन्हा एकदा संगीत विश्वात लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
आज मुंबईत आशा भोसले यांचे निधन झाले. शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातील चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी २० हून अधिक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, पॉप संगीत आणि द्वंद्वगीतांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
जेव्हा आर. डी. बर्मन यांनी हे गाणे आशाताईंकडे आणले, तेव्हा त्यांनी एक तक्रारही केली होती. "पंचम, तू मला नेहमीच अशा प्रकारची 'बोल्ड' गाणी का देतोस?" असा प्रश्न त्यांनी विचारला होता. मात्र, आर. डी. बर्मन यांना खात्री होती की हे गाणे तुफान गाजणार आणि त्यांचा तो विश्वास सार्थ ठरला.
या गाण्याशी संबंधित सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खुद्द गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची प्रतिक्रिया होती. स्टुडिओमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू होते, तेव्हा मजरूह सुलतानपुरी तिथून बाहेर निघून गेले होते. स्वतः लिहिलेल्या शब्दांमुळे त्यांना संकोच वाटत होता, असे सांगितले जाते.
'पिया तू अब तो आजा' व्यतिरिक्त आशा भोसले यांनी गायलेली 'हरे रामा हरे कृष्णा' आणि 'दम मारो दम' ही गाणी त्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र, आज हीच गाणी भारतीय संगीत क्षेत्रातील मैलाचा दगड मानली जातात.
आशा भोसले यांनी केवळ गाणीच गायली नाहीत, तर अनेक सर्वोच्च नागरी आणि कला पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ७ वेळा फिल्मफेअरचा 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्कार पटकावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. याशिवाय, त्यांना भारत सरकारतर्फे 'पद्मविभूषण' आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'धुरंधर' चित्रपटातील हमझा अली मझारी (रणवीर सिंग) आणि यलिना (सारा अर्जुन) यांच्यातील थरारक 'चेस सिक्वेन्स'मध्ये या गाण्याचा वापर केल्याने नव्या पिढीलाही या सुवर्णकाळाची भुरळ पडली आहे.