गायक अरिजित सिंह याचे जगभरात चाहते आहेत. तो नेहमीच आपल्या चाहत्यांना प्राधान्य देत असतो. आता असाच काहीसा प्रकार पुन्हा बघायला मिळाला आहे. अरिजितच्या ब्रिटनमधील एका संगीत कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसत आहे की, अरिजितची एक चाहती त्याच्याकडे जात आहे. पण, त्याच्या बॉडीगार्डने तिला थांबवले. चाहती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की, अरिजित हा मला आणि इतरांना हस्तांदोलनासाठी बोलवत होता. पण, बॉडीगार्डने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि तिला बाजूला ढकलले. स्टेजवरील अरिजितला हा प्रकार समजला.
एक महिला चाहती त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करत होती; पण त्याच्या बॉडीगार्डने तिच्या मानेला पकडून तिला बाजूला ढकलले. हे लक्षात येताच अरिजित महणाला की, अशाप्रकारे कोणालाही पकडणे अयोग्य आहे, मी तुम्हाला विनंती करतो कृपया बसून घ्या. मला माफ करा मॅडम, तुमचे संरक्षण करण्यासाठी मी तिथे असायला पाहिजे होतो, पण मी तिथे नव्हतो. कृपया बसून घ्या. त्याच्या या वागण्याचे चाहत्यांनी ओरडून कौतुक केले.