पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांनी पत्नी सायरा बानोपासून विभक्त झाल्याची नुकतीच घोषणा केली आहे. यानंतर काही दिवसांपासून सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, ए.आर.रेहमान हे एका वर्षासाठी संगीत जगतापासून ब्रेक घेणार आहेत. आता यावर त्यांची मुलगी आणि गायिका खतिजा रेहमान हिने खुलासा केला आहे.
काही सोशल मीडिया पोस्ट्स असा दावा करत होते की ए. आर. रेहमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील सततच्या समस्यांमुळे एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे. या दाव्यांना उत्तर देताना, खतिजा हिने X पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "कृपया अशा निरुपयोगी अफवा पसरवणे थांबवा." तिने केलेल्यला खुलाशामुळे ए. आर. रेहमान हे एक वर्षाचा ब्रेक घेणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
मी आणि माझी पत्नी सायरा बानो विभक्त होत आहेत, अशी पोस्ट ए. आर. रेहमान यांनी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी केली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "आम्ही तीस वर्षे एकत्र घालवण्याची आशा केली होती, परंतु प्रत्येक गोष्टीचा अदृश्य अंत आहे." यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी सायरा बानोच्या वकील वंदना शाह यांनी या जोडप्याच्या विभक्त होण्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले होते. यामध्ये नमूद केले होतं की, "सायरा यांनी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यातील भावनिक ताणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दोघांमध्ये प्रेम असले तरी, समस्यांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. अडचणी आता पार करणे अशक्य झाले आहे."