

अहमदाबाद : बनावट नोटांचा वापर करून येथील माणिक चौकातील सराफ मेहुल ठक्कर यांच्याकडून १ कोटी ३० लाख रुपयांची सोने खरेदी (२१०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे) करण्यात आली. परिचयातील एका मध्यस्थाच्या माध्यमातून हा व्यवहार झाला होता. ठक्कर यांच्याकडून या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मशिनने पैसे मोजताना ही बाब लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. नोटांवर महात्मा गांधीऐवजी बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाऐवजी रिसोल बँक ऑफ इंडिया असे नमूद आहे. तीन अनोळखी तरुणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
या बनावट नोटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द अनुपम खेर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या फोटोसह छापलेल्या नोटांचा फोटो शेअर करून काहीही होऊ शकते, असे खेर यांनी नमूद केले आहे.