पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा 2 : द रुल'ची (Pushpa 2 : The Rule Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरुच आहे. या चित्रपटाने १८ व्या दिवशी म्हणजे रविवारी भारतात ३८ कोटींची कमाई केली. यामुळे या चित्रपटाच्या भारतातील कमाईचा आकडा १,२६६ कोटींवर पोहोचलाय. दरम्यान, या चित्रपटाने जगभरात १,५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. विशेषतः या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने ६७९ कोटींची कमाई करत श्रद्धा कपूरच्या स्त्री २ (Stree 2) चित्रपटाला मागे टाकले आहे.
'Sacnilk'च्या रिपोर्टनुसार, पुष्पा २ ने आतापर्यंत जगभरात १,५०७ कोटींची कमाई केली. तिसऱ्या रविवारी या चित्रपटाने हिंदी व्हर्जनने २६.७५ कोटी जमवले. तर आतापर्यंत हिंदी व्हर्जनमध्ये ६७९.६५ कोटींचा व्यवसाय केला आहे. हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत पुष्पा २ अव्वल स्थानी पोहोचला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १९६ कोटींची कमाई केली होती. अद्याप या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरुच आहे.
सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत प्रभास स्टार कल्की 2898 एडी या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २'ने अक्षरक्ष: प्रेक्षक आणि अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना वेड लावले आहे.