

‘धुरंधर’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आलेली भाभीजी घर पर है मधील अभिनेत्री सौम्या टंडन आता दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या आगामी रोमँटिक ‘ड्रामा ये प्रेम मोल लिया’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये आयुष्मान खुराणा आणि शर्वरी झळकणार आहेत. ‘धुरंधर’मध्ये सौम्याने उल्फत रहमान ही भूमिका साकारली आहे, ती विशेष गाजली. अभिनेता अक्षय खन्ना यांच्या पत्नीच्या भूमिकेत तिने संयत अभिनय सादर केला. याच अभिनयाच्या जोरावर आता त्यांना सूरज बडजात्या यांच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाल्याचे मानले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ये प्रेम मोल लिया’मधील सौम्या टंडनची भूमिका केवळ पूरक स्वरूपाची नसून कथानकाला भावनिक वजन देणारी असेल. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील पुढील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.
‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘विवाह’सारख्या चित्रपटांमधून कुटुंबकेंद्रित, नातेसंबंधांवर आधारित कथा मांडणारे सूरज बडजात्या या चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या परिचित शैलीत परतताना दिसणार आहेत. दूरदर्शन, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अशा तिन्ही माध्यमांत यशस्वी वाटचाल करणार्या सौम्याने आपल्या बहुआयामी अभिनय क्षमतेचा ठसा उमटवला आहे. या नवीन चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा आणि पुढील तपशीलांची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.