मुंबई : पुढारी ऑनलाईन
खलनायक प्राण यांचा आज १०१ वा जन्मदिवस आहे. १९४० ते १९९० पर्यंत सिनेमा जगतात खलनायक म्हणून मिरवणारे प्राण आपल्या दमदार अभिनयासाठी आजदेखील ओळखले जातात. कृष्ण सिकंदर म्हणजेच प्राण यांनी त्याकाळी अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. परंतु, एक खलनायक म्हणून काही चित्रपटांमध्ये ते अभिनेत्याच्या भूमिकेपेक्षा चांगलेच गाजले. चित्रपटांमध्ये हिरोच्या मानधनापेक्षा त्यांना अधिक मानधन मिळत होते. प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी, १९२० रोजी दिल्लीमध्ये झाला होता. त्यांच्याविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. तर मग वाचा ही पुढील माहिती…
प्राण आधी लाहोरमध्ये अभिनय करायचे. त्यानंतर ते मुंबईमध्ये आले. प्रसिध्द उर्दू लेखक सादत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांच्यामुळे त्यांना देव आनंद अभिनित आणि बॉम्बे टॉकीज निर्मित चित्रपट 'जिद्दी'मध्ये संधी मिळाली. अभिनेते प्राण असे अभिनेते होते, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये खलनायकाची भूमिका अधिक साकारली. ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.
अभिनेते प्राण यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं थोडचं. 'अदालत,' 'जंजीर,' 'उपकार' 'बेईमान,' 'पाकीजा', 'बॉबी', 'अमर अकबर ॲन्थोनी' यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयामुळे हे चित्रपट गाजले. शिवाय, महानायक अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीत आणणारा अभिनेता म्हणून प्राण यांच्याकडे पाहिले जाते.
आपल्या रूबाबदार व्यक्तिमत्त्वाने आणि आवाजाने त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळी ऊंची गाठली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी ते आपली पत्नी आणि मुलासोबत लाहोरहून मुंबईला आले होते. प्राण यांना पान खाण्याची सवय होती आणि पानाच्या दुकानावरच त्यांना पहिल्याच चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर मिळाली. आपल्याला चित्रपटात काम मिळाल्याची माहिती त्यांनी आपल्या वडिलांपासून लपवली होती. जेव्हा वर्तमानपत्रात प्राण यांची मुलाखत छापून आली, तेव्हा मुलाखत वाचून त्यांच्या वडिलांना खूपच आनंद झाला होता.
प्राण यांना फोटोग्राफर व्हायचे होते, परंतु, ते अभिनेता झाले. आपल्या करिअरच्या सुरूवातीला प्राण यांनी एक फोटोग्राफी कंपनीत काम केलं. नंतर १९४० मध्ये चित्रपट 'यमला जट'मध्ये त्यांना काम करायची संधी मिळाली. प्राण यांनी १९४० ते १९४७ पर्यंत अभिनेता म्हणून काम केलं. नंतर १९४२ ते १९९१ पर्यंत खलनायक म्हणून काम केलं. त्यांनी काही चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणूनही भूमिका केल्या.
१ रूपयांचे मानधन
राज कपूर दिग्दर्शित 'बॉबी' चित्रपटात काम करण्यासाठी प्राण यांनी फक्त १ रू. मानधन घेतले होते. कारण राज कपूर यांचा 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सटकून आपटला होता. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या राज कपूर यांची स्थिती हलाखीची बनली होती. राज कपूर यांनी आपल्याकडील सर्व पैसे, संपत्ती 'मेरा नाम जोकर' या चित्रपटासाठी खर्च केली होती.
हिरोपेक्षाही ज्यादा मानधन
बहुतांशी चित्रपटात प्राण यांनी खलनायकाची भूमिका केली. पण, चित्रपटातील मुख्य अभिनेत्यापेक्षाही ते अधिक मानधन घेत होते. पुढे अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांनी प्राण यांना १९६७ मध्ये 'उपकार' चित्रपटात अभिनेता म्हणून संधी दिली. याच चित्रपटातलं 'मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती' हे गाणं हिट ठरलं. तसेच 'कसमे वादे प्यार वफा सब, बाते हैं बातों का क्या' हे प्राण यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं गाणंही हिट झालं होतं.
अमिताभ बच्चन यांना बिग बी बनवण्यात योगदान
महानायक अमिताभ बच्चन यांना बिग बी बनवण्यासाठी प्राण यांचं योगदान आहे. प्रकाश मेहरा यांच्या मदतीने बिग बी यांना 'जंजीर' चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून संधी देण्याची विनंती प्राण यांनी केली होती. 'जंजीर'मुळे बिग बींना चांगली प्रसिध्दी मिळाली.
३५० हून अधिक चित्रपटात अभिनय
प्राण यांनी तीनशे पन्नासहून अधिक चित्रपटात काम केलं. 'खानदान' (१९४२), 'पिलपिली साहेब' (१९५४), 'हलाकू' (१९५६) या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून भूमिका केल्या. तर 'मधुमती' (१९५८), 'जिस देश में गंगा बहती है' (१९६०), 'उपकार' (१९६७), 'राम और श्याम' (१९६७), 'शहीद' (१९६५), 'आँसू बन गये फूल' (१९६९), 'जॉनी मेरा नाम' (१९७०), 'पूरब और पश्चिम' (१९७०) 'विक्टोरिया नम्बर' २०३ (१९७२), 'बेईमान' (१९७२), 'जंजीर' (१९७३), 'डॉन' (१९७८), 'शराबी' (१९८४) आणि 'दुनिया' (१९८४) या चित्रपटातील त्यांचा अभिनय उत्कृष्ट मानला जातो.
१९७२ मध्ये 'बेईमान' चित्रपटासाठी त्यांना मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी परत दिला होता. 'पाकिजा' या चित्रपटाला एकदेखील पुरस्कार न मिळाल्याने प्राण यांनी हा पुरस्कार परत दिला होता. प्राण यांना २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
या हरहुन्नरी अभिनेत्याने २०१३ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.