अभिनयातला ‘मोठा माणूस’ निळू फुले 

Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन  

कलाकार निळू फुले यांचा आज १३ जुलैला ११ वा स्मृतिदिन. 'पुढारी पाहिजे,' 'कथा अकलेच्या कांद्याची', 'राजकारण गेलं चुलीत', 'सोकाजीराव टांगमारे,' 'सूर्यास्त' या नाटकांनंतर त्यांनी एक गाव बारा भानगडी, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, थापाड्या, 'चोरीचा मामला', 'शापित', 'सामना', 'सिंहासन', 'पिंजरा' यासारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केले. काही चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटातीलही त्यांचा अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे. 

निळू फुलेंच्‍या बोलण्यात एक लहजा होता. बोलण्‍याची लकब सगळ्‍यांत वेगळी असल्याने त्यांचा आवाज पटकन ओळखला जायचा. निळकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुण्यात झाला होता. त्‍यांचे वडील लोखंडी सामान व भाजीपाला विकत होते. त्‍यांचे दुकानही होते. निळूभाऊंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते.  

निळू फुलेंना अभिनयाची आवड पहिल्‍यापासूनच होती. सुरूवातीला नाटकातून आणि नंतर अभिनय क्षेत्रात त्‍यांनी आपला ठसा उमटवला. १९५७ मध्ये त्यांनी 'येरागबाळ्याचे काम नोहे' या लोकनाट्‍यात पहिल्‍यांदा काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या 'पुढारी पाहिजे' या नाटकातून त्यांच्या 'रोंगे' या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्‍यातून त्‍यांना प्रसिध्‍दी मिळाली. तर सुर्यास्त या नाटकामुळे ते अधिक लोकप्रिय झाले. 

रंगभूमीवर 'सूर्यास्त,' 'घरंदाज,' 'रण दोघांचे,' 'सखाराम बाईंडर,' 'जंगली कबुतर' आणि 'बेबी' ही त्यांची नाटके तर 'पुढारी पाहिजे,' 'कोणाचा कोणाला मेळ नाही,' 'कथा अकलेच्या कांद्याची,' 'लवंगी मिरची – कोल्हापूरची,' 'राजकारण गेलं चुलीत' ही त्‍यांची प्रमुख लोकनाट्ये गाजली.

रंगभूमीवरून ते सिनेजगतात जाताना त्‍यांच्‍यातील कलाकाराने आपली विविध रूपे मराठी सिनेसृष्‍टीला दाखवली. त्‍यांनी 'एक गाव बारा भानगडी' चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्‍टीत पाऊल ठेवले. 

निळूभाऊंचे मराठी चित्रपट

'सामना,' 'पिंजरा,' 'सोबती,' 'प्रतिकार,' 'पुत्रवती,' 'सहकार सम्राट,' 'शापीत,' 'हर्‍या नार्‍या,' 'पैज,' 'कळत नकळत,' 'जैत रे जैत,' 'पैजेचा विडा.' 

निळूभाऊंचे हिंदी चित्रपट

इतकेच नाही तर निळू यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. 'जरासी जिंदगी,' 'रामनगरी,' 'नागीन-२,' 'मोहरे,' 'सारांश,' 'मशाल,' 'सूत्रधार,' वो सात दिन,' 'नरम गरम,' 'जखमी शेर,' 'कुली' आदी चित्रपटांतूनही आपली वेगळी प्रतिमा तयार केली. 

निळु फुले यांना महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तीन वेळा मिळाला होता. अनंतराव भालेराव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी आदी पुरस्कारही त्यांना मिळाले होते. 

निळू फुले यांचे वयाच्‍या ७९ व्‍या वर्षी अन्ननलिकेच्या कर्करोगाने १३ जुलै, २००९ रोजी पुण्यात निधन झाले. 

निळू फुलेंची कन्या काय म्हणते? 

निळूभाऊंची खलनायक ही ओळख आहेच. पण, 'अभिनेता' यापेक्षाही 'मोठा माणूस' अशी त्यांची ओळख आहे. एका कार्यक्रमात त्यांची कन्या गार्गी फुले यांनी आपले वडील पडद्यामागे कसे होते, याबद्दल सांगितले होते. निळू फुले शांत स्वभावाचे, मोजकं बोलणारे आणि प्रेमळ होते. ते खूप सारी पुस्तके वाचायचे, असे गार्गी फुलेने म्हटले होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news