Govinda Wife: ‘माझ्या आयुष्यात काही राक्षस,माझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांचा नाश..’! : गोविंदाची पत्नी सुनीता आक्रमक

बॉलिवूडमध्ये खळबळ, गोविंदा-कोमल राणी यांच्या संबधांने प्रकरण तापले?
Actor Govinda wife Sunita Ahuja
Published on: 
Updated on: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांचे वैवाहिक आयुष्य पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहे. गेल्या काही काळापासून गोविंदा यांचे नाव त्यांच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटातील सहकलाकार कोमल राणी स्वर्णकार हिच्याशी जोडले जात आहे. या कथित संबंधांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नसली, तरी नुकतेच दोघेही मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी एकत्र पोहोचल्याने सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनीता आहुजा यांनी कोलकात्यातील प्रसिद्ध दक्षिणेश्वर काली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यातील संघर्षावर भाष्य करत महिलांसह आजच्या तरुण पिढीकडे (Gen Z) खंबीर पाठिंब्याची आर्त साद घातली आहे.

‘माझ्या आयुष्यातही काही राक्षस आहेत’ : सुनीता आहुजा

दक्षिणेश्वर काली मातेचे दर्शन आणि विधीवत पूजा केल्यानंतर सुनीता आहुजा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, माता काली ही दुष्टांचा आणि राक्षसांचा संहार करणारी देवता आहे. आपल्या खाजगी आयुष्यातील अडचणींचा संदर्भ देत त्या पुढे म्हणाल्या, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्यातही सध्या काही ‘राक्षस’ शिरले असून त्यांच्या त्रासातून मुक्ती मिळावी, यासाठी मी देवीकडे साकडे घातले आहे.’ जीवनातील संकटे दूर व्हावीत आणि मानसिक बळ मिळावे म्हणून देवीच्या चरणी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनीता यांनी कोणाचेही थेट नाव घेतले नसले, तरी त्यांचा हा रोख सध्या सुरू असलेल्या कौटुंबिक वादाकडेच असल्याचे मानले जात आहे.

या वेळी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक हा तमाशा करत असल्याचा आरोप करत, अशा वृत्तीला कोणीही खतपाणी घालू नये, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः महिला आणि नव्या पिढीला हाक देत त्या म्हणाल्या की, आज माझ्यासोबत जे काही घडत आहे ते अत्यंत अन्यायकारक आहे. कोणत्याही कारणाशिवाय माझा हसता-खेळता संसार उद्ध्वस्त केला जात असून अशा कठीण प्रसंगी मला समाजाच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे.

गोविंदा आणि कोमल राणी यांच्या नावाची चर्चा का?

गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्यातील कथित संबंधांची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत आहे. याआधीही दोघे मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दरबारात दोघांनी एकत्र हजेरी लावल्याने या चर्चांनी अधिक जोर धरला. गोविंदा यांनी मात्र या चर्चांचे खंडन केले असून हे संबंध केवळ व्यावसायिक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वीही आपण अनेक सहकलाकारांसोबत देवदर्शनाला गेलो असल्याचे सांगत, आगामी चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करायला लालबागच्या राजाकडे गेलो होतो, असा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे गोविंदा यांच्या बाजूने या प्रकरणात कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

घटस्फोटाच्या अर्जापासून ते माघारीपर्यंतचा घटनाक्रम

गोविंदा आणि सुनीता यांचा विवाह १९८७ मध्ये झाला असून त्यांना टीना आणि यशवर्धन अशी दोन मुले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या दाम्पत्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. डिसेंबर २०२४ मध्ये सुनीता यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली होती; मात्र त्यानंतर दोघांमध्ये सामोपचाराने तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले. ऑगस्ट २०२६ मध्ये गोविंदा यांच्या व्यवस्थापकांनी सुनीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याची अधिकृत पुष्टी केली होती आणि हे दोघे विभक्त होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर कोमल राणी यांच्यासोबत गोविंदा यांची वाढलेली जवळीक पुन्हा एकदा वादाचे कारण ठरली आहे.

सुनीता यांच्या विधानामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ

गोविंदा आणि कोमल राणी यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच सुनीता यांचे हे धक्कादायक वक्तव्य समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जरी त्यांनी कोणाचेही थेट नाव उच्चारले नसले, तरी ‘संसार मोडणाऱ्यांचा देवीने नाश करावा’ ही त्यांची आक्रमक प्रार्थना बरेच काही सांगून जाते. सध्याच्या या कौटुंबिक वादळावर आता गोविंदा नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news