मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूडचे हॅण्डसम अभिनेते दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर रोजी वाढदिवस. आपल्या अदाकारीने घायाळ करणाऱ्या सायरा बानो त्यांच्या पत्नी. सायरा बानो आई का बनू शकल्या नाहीत? याचा खुलासा खुद्द दिलीपकुमार यांनी केला होता. दिलीप कुमार यांच्या जन्मदिनी जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील 'या' खास गोष्टी.
आयशा बेगम यांचे बारावे पुत्र म्हणून महंमद युसूफ खान यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतातील पेशावर येथे झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. मुंबईच्या बांद्य्रातील पाली हिलमध्ये ते राहत असत.
कौटुंबिक पार्श्वभूमी
आई आयेशा बेगम, वडील गुलाम सरवर अली खान. वडील जमीनदार होते. ते फळांचा व्यापार करीत असत. व्यवसायासाठी ते पेशावरहून नाशिकच्या देवळाली येथे स्थायिक झाले. येथील बर्नी स्कूलमध्ये दिलीपकुमार यांचे शिक्षण झाले. मुंबईत कॉलेज शिक्षण घेत असताना त्यांची राज कपूर यांच्याशी मैत्री झाली. मिश्र धार्मिक वातावरणात त्यांचे बालपण गेले. काही वर्षांनी त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले.
सायरा यांचे 'जंगली'मधून डेब्यू
सायरा हिंदी अभिनेत्री नसीम बानो यांची कन्या. सायरा यांचं बालपण लंडनमध्ये गेलं. पण, १९६० मध्ये त्या मुंबईत आल्या. त्यावेळी त्यांची भेट निर्माता-दिग्दर्शक शशीधर मुखर्जी यांच्याशी झाली. येथून त्यांच्या करिअरला सुरूवात झाली. १९६१ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये चित्रपट 'जंगली'मधून डेब्यू केलं. त्यात शम्मी कपूर यांची मुख्य भूमिका होती. सायरा यांची चांगली अभिनेत्री म्हणून ओळख असली तरी त्या त्यांच्या लव्हस्टोरीमुळे ओळखल्या जातात.
बालपणापणापासूनच सायरा यांना दिलीपजींचे आकर्षण
सायरा बानो १२ वर्षांच्या असताना त्यांना सुपरस्टार दिलीपकुमार आवडायचे. एक फॅन ते एक पत्नी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास इंटरेस्टिंग आहे. सायरा बानो यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, '१२ वर्षांची असल्यापासून ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार मला आवडायचे.'
सायरा यांनी पहिल्यांदा दिलीपकुमार यांना १९५२ मध्ये 'आन' चित्रपटात पाहिलं होतं. तेव्हाच त्यांना दिलीपकुमार यांच्याशी प्रेम झालं. १९६६ मध्ये सायरा यांनी अभिनेता दिलीपकुमार यांच्याशी विवाह केला. त्यावेळी सायरा २२ वर्षांच्या तर दिलीपकुमार ४४ वर्षांचे होते. लग्नानंतर दोघांच्याही जीवनात अनेक चढ-उतार आले. दिलीपकुमार यांनी दुसरं लग्न देखील केलं. दिलीप कुमार यांनी आसमा नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं. सायरा बानो आई होऊ शकत नव्हत्या, म्हणून दिलीप यांनी हे लग्न केल्याचं म्हटलं जातं. परंतु, हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. दिलीप पुन्हा सायरा यांच्याकडे आले.
सायरा का आई बनू शकल्या नाहीत?
अभिनेता दिलीपकुमार यांनी आपल्या पुस्तकात 'द सब्सटेंस ॲण्ड द शॅडो'मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केल्याचं म्हटलं होतं. १९७२ मध्ये सायरा प्रेग्नेंट होत्या, हा खुलासाही खुद्द दिलीप यांनी केला होता. दिलीपकुमार यांनी पुस्तकात म्हटलं होतं की, 'प्रेग्नेंसीच्या आठव्या महिन्यात सायरा बानो यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्याचदरम्यान, आम्ही आमचं बाळ गमावलं. नंतर आम्हाला कळालं की, मुलगा होता. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. त्यानंतर सायरा कधी आई बनू शकल्या नाहीत.'