स्मिता पाटील चित्रपट महोत्सव : जगभरातील लघुपट पाहण्याची नामी संधी | पुढारी

स्मिता पाटील चित्रपट महोत्सव : जगभरातील लघुपट पाहण्याची नामी संधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जभरातील 21 देशांमधील 46 लघुपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना दहाव्या स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून मिळणार आहे. आरोग्य सेनेतर्फे आयोजित हा महोत्सव शनिवारी (दि. 6) आणि रविवारी (दि.7) विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित केला आहे. विविध विषयांवरील लघुपट प्रेक्षकांना विनामूल्य पाहायला मिळतील. शनिवारी (दि. 6) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि रविवारी (दि. 7) सकाळी नऊ ते सायकाळी सहा या वेळेत महोत्सव, महोत्सवाचा पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवारी सायंकाळी सात वाजता आरोग्य सेनेचे प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते होणार आहे.

या महोत्सवात भारतासह अमेरिका, इंग्लंड, इराण, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रांन्स, कॅनडा, स्पेन, सिंगापूर, रशिया, पोलंड, ग्रीस आदी देशांमधील लघुपट पाहता येणार आहेत. यातील अनेक लघुपट जगातील किमान 60 महोत्सवांमध्ये निवडले गेले असून, त्यातील अनेक भारतात प्रथमच दाखविले जाणार आहेत. या महोत्सवाच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या अनेक चित्रपटांच्या टीम महोत्सव काळात उपस्थित राहणार असून, रसिकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. चित्रपट दिग्दर्शक गगनविहारी बोराटे, दिग्दर्शक सोहिल वैद्य आणि अमेरिकेतील दिग्दर्शक-निर्माते बिजोन इम्तियाझ हे या महोत्सवाचे मानद ज्युरी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. प्राथमिक निवड समितीमध्ये सोहिल वैद्य, योगेश जगम, रसिका आगाशे, अनिश प्रभुणे, अतिश शिंदे हे काम पाहत आहेत.

हेही वाचा

Back to top button