सायरा बानू, दिलीपकुमार आणि तो पाऊस… | पुढारी

सायरा बानू, दिलीपकुमार आणि तो पाऊस...

पुढारी ऑनलाईन : इन्स्टाग्रामवर केवळ नव्या पिढीतील कलाकारच व्यक्त होतात, असे अजिबात नाही. जुन्या पिढीतील आघाडीच्या अभिनेत्री सायरा बानू यांनी दिलीपकुमारनी आपल्याला कसे प्रपोज केले होते आणि त्या सायंकाळचा पाऊस कसा वेगळा होता, याचे वर्णन करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे आणि अर्थातच, या पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

सायरा बानू यांनी यावेळी ते दोघेही पावसाचा आनंद घेत असतानाची काही छायाचित्रे देखील पोस्ट केली आहेत. सायरा बानू आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘रेन रेन गो टू स्पेन! लंडनमध्ये वयाच्या सातव्या वर्षी तेथील प्रशालेत शिकत असताना आम्ही याच ओळी गुणगुणत असू. इंग्लिश हवामान कसे लहरी आहे, हे तेथे आम्ही अनुभवले. क्षणात उन्ह अन् क्षणात पाऊस! नंतर आम्ही मुंबईत आलो आणि मी दिलीप साहेबांशी विवाह केला. त्यापूर्वीही पहिला पाऊस हा आमच्यासाठी सोहळाच असायचा. शुद्ध पाणी एकत्रित करण्यासाठी आम्ही भांडी बाहेर ठेवत असू.

सायरा यावेळी दिलीपकुमार यांच्याबद्दलही भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या, ‘दिलीप साहेबांना पाऊस विलक्षण आवडायचा. ते एखाद्या मिटींगसाठी बाहेर असतील आणि पहिला पाऊस झाला तर ते तेथूनच फोन करायचे, सायरा पहिला पाऊस पडतोय. आम्ही एकदा जुहू चौपाटीवर फिरायला गेलो होतो. पावसाची अशीच झुळूक आली आणि त्यांनी आपले जॅकेट काढून माझ्या खांद्यावर लपटले. परतताना मी त्यांच्या कारमध्ये बसले आणि त्यांनी मला विचारलं, ‘तू माझ्याशी लग्न करणार का? नंतर आम्ही ११ ऑक्टोबर १९६६ रोजी विवाहबद्ध झालो.

Back to top button