'महाराष्ट्र भूषण' माझ्यासाठी 'भारतरत्न' : आशा भोसले | पुढारी

'महाराष्ट्र भूषण' माझ्यासाठी 'भारतरत्न' : आशा भोसले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आली की तिचे कौतुक होते, तसे आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारताना डोक्यावरून, पाठीवरून मायेचा हात फिरत आहे. असे वाटते. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून मी गाते आणि आजही वयाच्या नव्वदीत रसिकांच्या प्रेमामुळेच गाते आहे, मला मिळालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार माझ्यासाठी ‘भारतरत्न’ आहे; कारण हा पुरस्कार मला घरातून मिळाला आहे, अशा भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केल्या.

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा २०२१ सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने प्रदान करण्यात आला. त्यावेळी नेहमीप्रमाणेच आशाताईंच्या जिंदादिल स्वभावाचे चाहत्यांना दर्शन घडले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर, राज्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सचिन तेंडुलकर, मनुकुमार श्रीवास्तव, सचिन तेंडुलकर, सांस्कृतिक सचिव विकास खरगे व्यासपीठावर उपस्थित होते. २५ लाख रूपये, मानधन आणि स्मृतिचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आशा भोसले म्हणाल्या. १९४३ साली माझे पहिले गाणे मी १० वर्षांची असताना ‘माझा बाळ’ या चित्रपटासाठी रेकॉर्ड केले. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून मी गाते आणि आजही गाते तेही रसिकांच्या प्रेमामुळेच अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

दत्ता डावजेकर, वसंत प्रभू, वसंत देसाई, सुधीर फडके, राम कदम, पु. ल. देशपांडे, यशवंत देव, आनंदघन, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत मी गाणी गायिली, जगदीश खेबूडकर, शांता शेळके, ग. दि. माडगूळकर, अशा अनेकांनी माझ्या गाण्याला शब्द- सूर दिले, मी ज्यांच्यासोबत कामे केली, त्यांनी जी गाणी संगीतबद्ध केली आणि लिहिली तशी गाणी लिहिणारेही आज नाहीत आणि संगीतकार तर नाहीतच, या सगळ्या गीतकार आणि संगीतकारांनी माझे जीवन समृद्ध केल्याची भावना आशाताईंनी व्यक्त केली. मी केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताची कन्या आहे, असे त्यांनी अभिमानाने हिंदीत नमूद केले. यापुढेही असेच प्रेम द्या. पुढील ९० वर्षांपर्यंत गात राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आशा भोसले यांनी रसिकांना गाण्याचा खजिना दिला आहे. एकवेळ राजसत्ता, खुर्ची मिळवणे सोपे; पण लहान मुले ते ज्येष्ठांच्या मनावर गाण्यांच्या माध्यमातून अधिराज्य करणे सोपे नाही, ते काम आशाताईंनी केले. त्यांच्या कर्तृत्वापुढे हा पुरस्कार छोटा आहे. मात्र या पुरस्काराची उंची त्यांच्यामुळे वाढली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शतकात एखाद्या लता मंगेशकर होतात, तशाच एखाद्याच आशा भोसले होतात. मंगेशकर कुटुंबीयांनी संगीताची जी सेवा केली आहे, त्यासमोर हा पुरस्कार छोटा असला, तरी त्यातून आपलेपण जपण्याची भावना असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व सपना मुनगंटीवार यांच्या वतीने आशा भोसले यांना बासरी भेट देण्यात आली. विकास खरगे यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चावरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मीनल जोगळेकर यांनी केले.

कोल्हापूरच्या आठवणींना उजाळा

यावेळी अभिनेते सुमीत राघवन यांनी घेतलेल्या छोटेखानी मुलाखतीला आशाताईंनी दिलखुलास उत्तरे दिली. मला नेहमीच माझ्या हसण्याचे रहस्य विचारले जाते, रहत जगायचे की, हसते जगायचं, हे आपणच ठरवायचे, मी हसत जगते, आपल्या पहिल्या गाण्याचा प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, मी तेव्हा कोल्हापुरात होते, गाणे गायच्या भीतीने थरथरत होते, पळून जावेसे वाटत होते. हे गाणे चित्रपटात येणार की नाही, माहिती नव्हते पण मी गाणे गायिले नाही तर घरी मार बसेल, ही भीती होती, त्यावेळी रंकाळा तलावाच्या भोवती आम्हाला चालवले, लाईटसच्या रिफेल्टसनी मी बेशुद्ध पडले, तेव्हापासूनच मी ठरवले चित्रपटात काम करायचे नाही, अशी आठवण आशाताईंनी सांगितली.

 

Back to top button