चेतन भगत यांचा सनसनाटी खुलासा! ‘त्याने’ आत्महत्येसाठी भाग पाडलं होतं | पुढारी

चेतन भगत यांचा सनसनाटी खुलासा! 'त्याने' आत्महत्येसाठी भाग पाडलं होतं

मुंबई ; पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा उलगडा अद्याप झाला नाही. परंतु, त्याच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यावरून इंडस्ट्रीत वादही निर्माण झाले आहेत. कधी कंगना राणावत आणि तापसी पन्नू एकमेकांवर आरोप करत आहेत. करण जोहर स्वत: ट्विटरवरून दूर होतो. अनुराग कश्यप आपला राग व्यक्त करत कुणाला ना कुणाला तरी फटकारत आहे. आता या दरम्यान प्रसिध्द लेखक चेतन भगत यांनी एक सनसनाटी खुलासा केला आहे. चेतन भगत यांनी एका प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, त्या दिग्दर्शकाने मला इतकं भाग पाडलं की, मी आत्महत्या करण्याचा विचार करू लागलो होतो. 

खरंतरं, सुशांत सिंह राजपूतचा आगामी चित्रपट ‘दिल बेचारा’वरून चेतन भगत आणि विधु विनोद चोप्रा यांची पत्नी, चित्रपट समीक्षक अनुपम चोप्रा यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादात चेतन यांनी अनुपमा यांना उद्देशून खुलासा केला की, आपले पती विधु विनोद चोप्रा यांनी आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं होतं. 

जेव्हा चेतन भगत यांनी ‘दिल बेचारा’ चित्रपटाविषयी ट्विट केलं होतं, तेव्हा या वादाची सुरूवात झाली होती. चेतन यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं- ‘सुशांतचा अखेरचा चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार आहे. मी सर्व समीक्षकांना सांगेन की, हुशारीने लिहा. ओव्हर स्मार्ट बनून काम करू नका. काहीही लिहू नका. निष्पक्ष आणि समजूतदार बना.’

दिग्दर्शक विधू यांची पत्नी अनुपमा यांना चेतन भगत यांची ही कॉमेंट आवडली नाही. अनुपमा यांनी पलटवार करत लिहिले की- ‘समजूतदारपणाचा स्तर यापेक्षा खाली जाणार नाही, असा विचार काही जण करतात. मात्र तरीही दुर्दैवानं तो स्तर घसरतो.’ 

अनुपमा यांच्या कॉमेंटला चेतन भगत यांनी प्रत्युत्तर दिले आणि विधू चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केले. चेतन यांनी म्हटले की, ‘विधू विनोद चोप्रा यांनी कोणतीही लाज न बाळगता कहाणीशी संबंधित सर्व पुरस्कार स्वत: घेतले. त्यांनी माझा अपमान केला. त्यांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडलं होतं.’ ‘दिल बेचारा’चे दिग्दर्शन मुकेश छाबडा यांनी केलं आहे. हा चित्रपट २४ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Back to top button