

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली मालगाडी केम (ता. करमाळा) रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरून घसरली. ही घटना आज (रविवार) मध्यरात्री 2 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.
चेन्नईकडून मुंबईच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालगाडी मध्ये रेल्वेच्या सोलापूर विभागात केम स्थानका जवळ लूप लाईनवरून मेन लाईनला येत असताना मालगाडी घसरली. त्यामुळे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या काही वेळ उशिरा धावल्या.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घसरलेली मालगाडी बाजूला करून दिल्याने सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र मालगाडी रुळावरून घसरण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. चौकशीनंतर या अपघाताचे कारण समोर येईल.' अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
हेही वाचा :