रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी आता खरीप व रब्बी हंगामासाठी कर्जाची उचल करू लागले आहेत. एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 च्या पंधरवड्यापर्यंत खरीप व रब्बी मिळून 356 हजार 789 शेतकर्यांनी 332 कोटी 96 लाखांच्या कर्जाची उचल जिल्ह्यात केली आहे. खरिपाच्या तुलनेत रब्बीसाठीच्या कर्जाची टक्केवारी मात्र कमी आहे.
कोकणात विशेषत: रत्नागिरीमध्ये शेतीसाठी कर्ज उचलणार्यांची संख्या कमीच आहे. ग्रामीण भागात गावपातळीवरील खरेदी-विक्री सोसायट्यांमधून शेतकरी कमीत कमी कर्ज उचलण्यावर भर देत असतो. मागील दहा-बारा वर्षांपासून जिल्ह्यात कर्ज उचलणार्यांची संख्या वाढू लागली आहे. शेतीमध्ये करण्यात येणारे प्रयोगही यात महत्त्वाचे कारण बनले आहे.
रत्नागिरीत भातशेतीचेप्रमाण मोठे आहे. गुंठ्यागुंठ्याची शेती अनेक ठिकाणी विभागली असल्याने त्यावर खर्च वाढत आहे. शेतीमधील कमी होणारे मनुष्यबळ, त्यासाठी वाढलेला खर्च, यांत्रिकीकरण, खते व अन्य गोष्टींसाठीही खर्च वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात छोट्या कर्जदारांची संख्या मोठी आहे. खरीप हंगामासाठी चालूवर्षी 257 कोटी 70 लाख रुपयांची उचल 53 हजार 486 शेतकर्यांनी केली. बँकांनी 111 टक्क्यांचा लक्षांक गाठला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत कर्जाची उचल तब्बल बारा कोटींनी कमी झाली. रब्बी हंगामाची तयारी शेतकर्यांनी सुरु केली आहे. दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा शासनाने केली असून, त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरु झाली आहे. परंतु शेतकर्यांकडून अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नव्याने कर्ज उचलण्यासाठी दिसत नाही. चालू वर्षी रब्बी हंगामासाठी 289 कोटींचे कर्जाचे उद्दिष्ठ आहे. परंतु 17 जानेवारीपर्यंत रब्बी हंगामासाठी 75 कोटी 26 लाख 91 हजार रुपये कर्जाची उचल झाली आहे. हे प्रमाण 26 टक्के इतके कमी आहे. मागील वर्षी रब्बी हंगामासाठी 186 कोटी 21 लाख रुपये कर्जाचे वाटप बँकांनी केले होते.
आतापर्यंत खरीप व रब्बी हंगामासाठी झालेल्या कर्ज वाटपात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून हात आकडता घेतला जात असल्याचे चित्र दिसत आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील 56 हजार 789 शेतकर्यांनी 332 कोटी 96 लाख 91 हजार रुपये कर्जाची उचल केली आहे.