

नागपूर ; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेने राबवलेल्या शिवसंपर्क अभियानानिमित्त संजय राऊत राज्याचा दौरा करत आहेत. या दरम्यान अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवर त्यांनी भाष्य केले. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसैनिक नाराज झाले यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुचक वक्तव्य केले आहे. नागपुरमध्ये संजय राऊत यांनी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोल्हापूर उत्तर जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचा विचार करता ज्या जागा आमच्या पक्षाकडे नाही त्याठिकाणी संघटनात्मक बांधणी करून निवडणूक लढवण्याचा आमचा मानस आहे.
कोल्हापूरची जागा अनेक वर्ष शिवसेना लढत आहे आणि जिंकत आहे. परंतू २०१९ ला शिवसेना-भाजपा युती असताना शिवसेनेचे राजेश क्षिरसागर पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला. त्यामुळे पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीत या जागेबाबत पुन्हा चर्चा होईल असं सांगत सूचक विधान केले आहे.
राऊत यांनी सांगितले की नवाब मलिक यांना खोट्या आरोपात केंद्रीय तपास यंत्रणांनी अडकविले आहे. मलिक आणि देशमुख यांच्यावरील आरोप अद्याप सिध्द झाले नाहीत. त्यामुळे नवाब मलिक हे कॅबीनेट मंत्री राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजिनामा घेणार नाही असे रोखठोक उत्तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज भाजपाला दिले. ते नागपुरात बोलत होते. तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चुकच होती. त्यांचा राजीनामा घेणे हा निर्णय घाईचा ठरला असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले.
तसेच अनिल देशमुख यांच्यावर ईडी ने शेकडो कारवाया केल्या मात्र त्यातून काहीही सिध्द झाले नाही. केन्द्रातील भाजपा सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर चालविला आहे. महाराष्ट्र आणि बंगाल मध्ये केंद्रीय तपास यंत्रणा मार्फत षड्यंत्र रचण्यात राजकीय सहभाग असल्याचा आरोप राऊत यांनी केला. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तेथे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून खोट्या कारवाया करून राजकीय षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
त्यामुळे केन्द्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा झाला असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच केंद्रीय तपास यंत्रणां ह्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागतात. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांने कितीही दबाव आणला तरी शिवसेना वाकणार नाही, कोणीही वाकवू शकत नाही आणि महाविकास आघाडी सरकारचा कोणीही बाल बाका करू शकणार नाही,असे जाहिर आवाहन राऊत यांनी भाजपाला दिले.
भाजपाने आव्हान दिले होते की महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ जेल मध्ये दिसेल. मात्र त्यांच्या कडे केंद्रीय तपास यंत्रणा आहे तर महाराष्ट्राकडेही असलेले पोलीस सक्षम आहे. येत्या काळात कोण कोण जेल मध्ये जाणार हे लवकरच दिसेल. पण महाराष्ट्र हा दिल्ली पुढे वाकणार नाही असे खुले आव्हान राऊत यांनी भाजपला दिले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे जनाब लावले जाते असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं होतं. या संदर्भात राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, नागपुरात प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. आम्ही पण रास्व संघाकडे हिंदुत्ववादी संघटना म्हणून आदराने बघतो.
त्या संघटनेचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची मागील काही वर्षातील मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य बघितली तर संघालाही जनाब संघ म्हणणार का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुसलमानांसाठी राष्ट्रीय मुस्लिम मंचाची स्थापना केली.
डॉ मोहन भागवत यांनी अनेकदा सांगितले की मुसलमानांचा आणि हिंदूंचा डिएनए सारखा आहे म्हणून काय मोहन भागवत हे जनाब संघाचे प्रमुख झाले का? भाजपाने नेमलेले अनेक राज्यपाल मुसलमान आहेत असे सांगत राऊत यांनी जनाब वरून प्रतिप्रश्न केले.
चंद्रपुर जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झालेला आहे अशी तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयामार्फत चौकशी सुरू आहे. आणि या प्रकरणात कारवाई होईल असे राऊत यांनी सांगितले.