

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : मोटार वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करण्यासाठी आकारण्यात येणार्या फीमध्ये वाढ झाली आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तांनी नुकताच काढला असून, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीयूसी केंद्रांना भेटी देऊन वायुवेग पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे.
मोटार वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करून वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र जारी करण्यासाठी राज्यातील वायू प्रदूषण नियंत्रण चाचणीच्या दरामध्ये परिवहन आयुक्त कार्यालयाने वाढ केली आहे. दुचाकी वाहनांसाठी पूर्वी 35 रुपये दर होता तो आता 50 रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनांसाठी पूर्वी 70 रुपये दर होता तो आता 100 रुपये, पेट्रोल सीएनजी एलपीजीवर चालणारे चार चाकी वाहन पूर्वी 90 रुपये दर होता तो आता 125 रुपये, डिझेलवर चालणार्या वाहनांसाठी पूर्वी 110 रुपये दर होता तो आता 150 रुपये राहणार असून,याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वायू प्रदूषण तपासणी केंद्रांच्या मालकांची बैठक घेऊन त्यांना नवीन दराबाबत माहिती दिल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक वायू प्रदूषण तपासणी केंद्रावर सुधारित दराचे फलक दर्शनी ठिकाणी लावावेत. सुधारित दरानुसार पीयूसी केंद्राकडून अंमलबजावणी होतेय का नाही? याची खातरजमा करण्यासाठी
वायुवेग पथकामार्फत पाहणी करण्यात येणार आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या दराप्रमाणे मोटार वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करून दर आकारण्यात यावेत. शासनाने दिलेल्या दरापेक्षा कोणी जादा दर आकारल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करावी.
– विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी