सातारा : जिल्ह्यात थंडीचा कडाका; दिवसभर हुडहुडी

सातारा : जिल्ह्यात थंडीचा कडाका; दिवसभर हुडहुडी
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवस वातावरणातील बदलामुळे जिल्ह्याच्या तापमानात सतत चढ-उतार होत आहे. गेल्या चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून शनिवारी तापमानाचा पारा घसरला. शनिवारी सातार्‍याचे तापमान 16 अंश, महाबळेश्वरचे 9 अंश इतके नोंदवण्यात आले. दिवसभर ढगाळ हवामान राहिल्याने हवेत गारठा जाणवत होता. थंडीने दिवसाही हुडहुडी भरत होती.

समुद्र किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा, चक्री वादळ आदिंमुळे थंडीची तीव्रताही कमी अधिक होत आहे. कधी शीतलहरी व गार वारे वाहत असल्याचा परिणाम तापमानावर होत आहे. त्यामुळे मागील काही दिवस जिल्ह्यातून थंडी गायब झाली होती. परंतु नवीन वर्षात मागील चार दिवसांपासून थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा घसरु लागला आहे. रात्री कडाक्याची थंडी आणि पहाटेच्यावेळी दाट धुके पडत आहे. शनिवारी सातारा शहराचे तापमान16 तर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचे तापमान 9 अंश इतके नोंदवण्यात आले. रात्रीच्या वेळी थंडीचा जोर वाढत असल्याने रात्रपाळीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. बोचर्‍या थंडीत शेकोट्यांभोवती गप्पांचे फड रंगू लागले आहेत.

जिल्ह्यात शनिवारी सातारा शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान राहिल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत होता. गारठा वाढल्याने लहान बालके व वयोवृध्दांना आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याने विशेष काळजी घ्यावी लागत आहे. दरम्यान, वाढती थंडी गहू, हरभरा, ज्वारी आदि रब्बीच्या पिकांसाठी पोषक आहे. मात्र, पहाटेच्यावेळी पडणार्‍या धुक्यामुळे कांदा तसेच फळबागांना फटका बसत आहे. फुलोर्‍यात येणार्‍या पिकांचे उत्पादन घटण्याच्या शक्यतेने बळीराजा धास्तावला आहे.

गुलाबी थंडीत पर्यटनाचा आनंद…

वाढत्या थंडीत पर्यटन बहरल्याने जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, तापोळा, औंधसह विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. या पर्यटकांकडून स्थानिक रानमेवा चाखला जात आहे. जवळच्या डेस्टीनेशनसाठी कृषी पर्यटन व हुर्डा पार्टीलाही पसंती दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news