सांगली : जीवनदायी औषधांच्या किमती जीवघेण्या
सांगली; उद्धव पाटील : नियंत्रणात असलेल्या आणि नियंत्रणात नसलेल्या औषधांच्या किमतीचा वाढलेला 'डोस' रुग्णांना सोसवेना झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत औषधांच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शासनाचा कंट्रोल नावापुरता आहे. त्यामुळे कंपन्यांची नफेखोरी आणि औषध पुरवठा साखळीतील मार्जिनची उंच उड्डाणे सुरूच आहेत. जीवनावश्यक, जीवरक्षक औषधांवरील कराबाबत शासनाचे धोरण सहानुभूतीचे असणे आवश्यक आहे. मात्र, औषधांच्या महागाईत कराचा वाटाच 5 टक्के व 12 टक्के इतका आहे. पूर्वीच्या करात जीएसटीने 0.9 टक्के ते 7.6 टक्क्यांची भर टाकली आहे. औषधांच्या महागाईत कराचा वाटाही वाढता आहे.
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारासारखा आजार तर एकदा का सुरू झाला की, जीवनभराचा साथीदार बनतो. त्यामुळे नियमित व दीर्घकालीन औषधांच्या गरजेचे प्रमाण वाढले आहे. भारताला मधुमेह, रक्तदाबाची जागतिक राजधानी असे संबोधले जाते. एकूणच अनेक आजारांनी आणि त्यावर होणार्या खर्चाने लोक वैतागून गेले आहेत. अशा परिस्थितीत औषधांच्या वाढत्या किमतीच्या वेदना सहन होण्यापलीकडे जात आहेत.
काही नमुने वानगीदाखल
रक्तदाबाच्या पंधरा गोळ्यांची एक स्ट्रिप 30 रुपयांना मिळत होती. तिची किंमत आता 45 रुपये झाली आहे. सहा महिन्यांत 15 रुपयांची वाढ झाली आहे. मधुमेहावरील दहा गोळ्यांची एक स्ट्रिप 55 रुपयांना मिळायची; त्यासाठी आता 65 रुपये मोजावे लागत आहेत. ही वाढ 18 टक्के आहे. मधुमेहाची बेसिक औषधे पाच वर्षांपूर्वी 7 रुपयांना होती, त्यासाठी आता 16 रुपये मोजावे लागत आहेत. मधुमेह, रक्तदाब ही औषधे नियमितपणे आणि बराच कालावधी वापरावी लागत आहेत. त्यामुळे या औषधांच्या किंमतीवरील नियंत्रण अधिक काटेकोर आवश्यक आहे. अँटिबोयोटिक्सच्या 10 गोळ्यांची एक स्ट्रिप 150 रुपयांना मिळायची. या स्ट्रिपची किंमत आता 169 रुपये झाली आहे. पेनकिलरची दहा गोळ्यांची एक स्ट्रिप 45 रुपयांना मिळायची; आज त्यासाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत. पित्ताची गोळी चार-पाच महिन्यांपूर्वी 80 पैशांना मिळायची, त्याचीही किंमत आता 1.25 रुपये झाली आहे.
नियंत्रणातील किंमत नियंत्रणाबाहेर..!
रक्तदाबावरील अॅमलोडिपीन अॅण्ड अॅटेनेलॉल या दहा गोळ्यांची 'एमआरपी' 92 रुपये आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याची किंमत 78 रुपये होते. पाचवर्षांपूर्वी या गोळ्याची स्ट्रिप 53 रुपयांना मिळायची. किमतीची वाटचाल दुपटीकडे सुरू आहे. रक्तदाबावरील मेटोप्रोलॉल अॅण्ड अॅम्लोडिपीन या पंधरा गोळ्यांच्या स्ट्रीपची आजची किंमत 129 रुपये आहे. वर्षापूर्वी ही किंमत 99 रुपये होती. अलीकडे किमतीच्या वाढीचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यासाठीच्या अँटिबायोटिक ड्रॉप्सची किंमत वर्षभरात 173 रुपयांवरून 209 रुपये झाली आहे. काही ड्रॉप्सची किंमत तर 392 रुपयांवरून 430 रुपये झाली आहे. किमतीसाठी नियंत्रणात असलेल्या एका अँटिबायोटिक्सला एका कंपनीने लॅक्टिक अॅसिड बॅसिलसची जोड दिली आणि किंमत नियंत्रणाबाहेर नेली आहे. त्यामुळे या अँटिबोयोटिकची किंमत 200 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले.
इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू), क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू), इंटेन्सिव्ह कार्डियाक केअर युनिट (आयसीसीयू), नियो नेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) या व्यतिरिक्त रुग्णालयातील ज्या खोलीचे प्रतिदिन शुल्क 5 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा रुग्णालयाना दि. 18 जुलैपासून 5 टक्के इतका दर लागू झाला आहे. साहजिकच हा खर्च रुग्णांच्या बिलातूनच वसूल होणार आहे. उपचारानंतर आजाराच्या वेदना कमी होत आहेत, पण औषध व उपचाराच्या वाढत्या खर्चाच्या वेदना रुग्णांना असह्य होऊ लागल्या आहेत.
'जीएसटी'ने 7.60 टक्क्यांपर्यंत वाढ
अॅलोपॅथिक वैद्यकीय सेवेमध्ये वापरल्या जाणार्या फॉर्म्युलेशन (गोळ्या, कॅप्सूल, लिक्विडस्) आणि इतर आरोग्याशी संबंधित वस्तूंवरील जीएसटी शून्य टक्के, 5 टक्के आणि 12 टक्के या तीन श्रेणींमध्ये येतात. मानवी रक्त आणि त्याचे घटक आणि सर्व प्रकारच्या गर्भनिरोधकांवर जीएसटी नाही. फॉर्म्युलेशनवरील जीएसटी बहुतेक औषधांसाठी 12 टक्के आहे. पूर्वीच्या 9.5 टक्के प्रभावी दराच्या (व्हॅट आणि उत्पादन शुल्क) तुलनेत तो जादा आहे. ओआरएस, लस आणि इन्सुलिन यांसारख्या काही औषधांवर उत्पादन शुल्क नव्हते. मात्र, 5 टक्के व्हॅट होता, त्यावर आता 5 टक्के जीएसटी आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर (दि. 1 जुलै 2017 पासून) औषधांच्या 'एमआरपी' मधील वाढ ही 0.90 टक्के किंवा 7.6 टक्के झाली आहे.
औषधाचे प्रमाण कमी; किंमत मात्र वाढवली
वेदनानाशक मलमची ट्यूब 30 ग्रॅमची असायची. ट्यूबमध्ये आता 21 ग्रॅमच मलम येत आहे. ट्यूबमधील मलमचे प्रमाण कमी झाल्याने दर कमी झाला असेल, अशी धारणा सर्वांचीच होईल. पण, सुरुवातीला मलम कमी करून दर तोच ठेवला आणि सहा महिन्यात कंपनीने दर मात्र 13.68 टक्क्यांपर्यंत वाढवत नेला आहे. 95 रुपयांच्या या मलमच्या ट्यूबला 108 रुपये मोजावे लागत आहेत. जखमेवरील मलमच्या ट्यूबमध्येही 30 ग्रॅम औषध असायचे. या ट्यूबमध्ये आता 20 ग्रॅमच औषध येत आहे. औषधाचे प्रमाण कमी केले असले तरी सहा महिन्यांत किंमत मात्र वाढवली आहे. मात्र, यावर शासनाचा काहीच अंकुश दिसत नाही.

