समृद्धी महामार्ग ठरतोय किलर मार्ग; ५ महिन्यांत ९५ मृत्यू, ३३ टक्के अपघात महामार्ग संमोहनमुळे
मुंबई : पुढारी वृत्तसेवा आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर दरम्यान सुपरफास्ट प्रवासासाठी तयार केलेला समृद्धी महामार्ग हा वाहन चालकांसाठी किलर मार्ग ठरत आहे. गेल्या ५ महिन्यात या महामार्गावर ९५ जणांचा विविध अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातांमागे ३३ टक्के महामार्ग संमोहनाचे कारण असल्याचा निष्कर्ष नागपुरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीएनआयटी) विद्यार्थ्यांनी काढला आहे. धक्कादायक म्हणजे आरटीओतील अधिकाऱ्यांनीही या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे.
मुंबई-नागपूर दरम्यानचा (७०१किमी) १६ तासांचा रस्ते प्रवास ८ तासांवर आणण्यासाठी समुद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेला हा महामार्ग १० जिल्ह्यांमधून जातो. या महामार्गातील नागपूर ते नाशिक हा ५२० किमीमार्गामुळे प्रवासी वेळेत बचत होत असली तरी, गेल्या ५ महिन्यात या मार्गावर १९५ लहान-मोठे अपघात झाले. त्यात ९५ जणांनी आपला जीव गमावला आहे.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी दरम्यान पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर वाहनांचा प्रवासाचा वेळ कमी झाला. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता वाढली. आऱटीओची कारवाई, दंड आकारणी, समुपदेशन करुन देखील अपघाताचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे नागपुरातील व्हीएनआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या वाहतूक विभागाच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरील शंभर किलोमीटरच्या टप्याचा तीन महिने अभ्यास केला. त्या अभ्यासातून महामार्ग संमोहनाचा निष्कर्ष काढला आहे.
महामार्ग संमोहन म्हणजे काय?
एखाद्या सरळ महामार्गावर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमचे वाहन एका सरळ रेषेत धावत असेल. तर चालक या परिस्थितीला सरावतो. त्यामुळे त्याची शारीरिक हालचालही स्थिर होते. मेंदू या क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रीय नसतो. या स्थितीलाच 'महामार्ग संमोहन' असे म्हटले जाते. चालक आवश्यक तेवढा दक्ष राहत नाही. त्यामुळे काही सेकंदाचा बेसावधपणा अपघाताचे कारण ठरतो. ही जागतिक संकल्पना आहे. जगभरात या कारणापायी अपघात होतात. त्यामुळेच बराच वेळ वाहन चालविताना काही वेळ तरी ब्रेक घेणे आवश्यक असते.
ईतर कारणे –
वेगमर्यादा, लेनचे पालन न करणे, टायर फुटणे,
तीन लेन
या मार्गावर ३० टक्के चारचाकी, २० टक्के लहान मालवाहतूक करणारी वाहने आणि ५० टक्के ट्रकचा समावेश आहे. महामार्गावर प्रत्येक दिशेला तीन लेन आहेत. त्यामुळे वाहनांची समोरासमोर टक्कर होत नाही. परंतु ट्रक चालक सर्रास लेन बदलून प्रवास करतात. त्यामुळे अपघात होतात.
थांबे आवश्यक
पाश्चात्य देशांमध्ये महामार्गावर दर १२० ते १२५ किलोमीटरच्या अंतरानंतर सोयीस्कर रित्या थांबे दिलेले आहेत. त्यामुळे वाहन चालक तेवढे अंतर सतत वाहन चालविल्यानंतर छोटासा ब्रेक घेउ शकेल. यामुळे नागपूर ते नाशिक ५२० किमी आणि प्रवासी सेवेत येणाऱ्या नाशिक ते मुंबई १८१ किमी या मार्गावर प्रत्येक ५० किमीवर थांब्यांची तरतूद करण्याची मागणी जोर धरत आहे.

