'काली' या माहितीपटकर्त्या लीना मणिमेकलाई यांनी स्वतःचे वर्णन डॉक्युमेन्टरी फिल्ममेकर तसेच उत्कट स्त्रीवादी म्हणून केले आहे. स्त्रीवाद ही सर्व स्त्रियांना समानता आणि मुक्ती देण्यासाठी एक आवश्यक अशी सामाजिक चळवळ आहे. केवळ काही लोकांच्या निवडीच्या स्वातंत्र्याची नव्हे. आजकाल 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरमुळे लीना मणिमेकलाई चर्चेत आहे. तिने स्वतःचे वर्णन डॉक्युमेन्टरी फिल्ममेकर तसेच उत्कट स्त्रीवादी म्हणून केले आहे. तिच्या मते, देवी कालीने धूम्रपान करणे हे महिला सशक्तीकरणाचे पर्यायी द्योतक आहे. याआधी आणखी एक कथित स्त्रीवादी महिला क्षमा बिंदूने स्वतःशी लग्न केले. अनेक वृत्तपत्रांनी स्त्रीमुक्ती, स्त्री सशक्तीकरण, पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या तोंडावर चपराक अशा उपमा देऊन क्षमाच्या मुद्द्यांचा गौरव केला. असे होणे साहजिकच आहे.
कारण, माझे शरीर-माझी पसंती हीच स्त्रीवादाची मोहीम समजणार्यांकडून याहून अधिक अपेक्षाही केली जाऊ शकत नाही.
'स्त्री सशक्तीकरण' असे नाव देऊन आपल्या मर्जीने स्त्रीवाद मांडणे ही सध्या खूप मोठी दुर्दैवी गोष्ट बनली आहे. यामुळे स्त्रीवादी चळवळींचे अथक प्रयत्न कलंकित होऊन उपभोगवादी स्त्रीवादाचा उदय झाला आहे. याअंतर्गत पोल डान्सपासून ते न्यूड सेल्फी, सिगारेट आणि दारू पिणे हे महिला सक्षमीकरणाचे द्योतक मानले जात आहेत. सशक्तीकरण हा शब्द आपल्याला आवडेल ते करण्यासाठी एक आवरण म्हणून उदयास आला आहे आणि या सगळ्या झगमगाटाच्या आड सशक्तीकरणाची खरीखुरी गरज असलेल्या महिला जणू नाहीशाच झाल्या आहेत.
'मेरी मर्जी' म्हणणारा स्त्रीवाद प्रथमदर्शनी नकारात्मक वाटत नाही; पण हा तथाकथित स्त्रीवाद असून, तो स्त्रीमुक्तीचा उल्लेख कधीच करत नाही. हा स्त्रीवाद सामाजिक परिवर्तनाची मागणी करत नाही आणि तो महिला सक्षमीकरणाच्या मोहिमेला अप्रत्यक्षपणे कमकुवत करण्याचेच काम करतो. या खोट्या स्त्रीवादावर कोणी टीका केली, तर त्याला स्त्रीविरोधी असे लेबल लावले जाते. 'शॉपिंग टू नेकेड सेल्फीज हाऊ एम्पॉवर्मेन्ट लास्टस्' या लेखात हेडली फ्रीमन लिहितात की, अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन हिने टॉपलेस सेल्फी ट्विट केला. एवढेच नव्हे, तर कामुकतेमुळे आपण सशक्त होत असल्याचे तसेच जगभरातील मुली आणि महिलांना सशक्तीकरणाच्या दिशने प्रेरित करण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे ट्विट तिने केलेे. उदार स्त्रीवादाची तळी उचलणारी किम कार्दशियन हिच्या मते तिच्या या तत्त्वज्ञानाला कोणी विरोध केला, तर त्या व्यक्तीचे वर्णन बॉडी शेमिंगला प्रोत्साहन देणारी, एक हरलेली पुराणमतवादी व्यक्ती असेच करावे लागेल.
वस्तुतः स्त्रीवादाच्या नावाखाली सुरू असलेल्या भलत्याच अवडंबरामुळे दुखावलेला कोणताही संवेदनशील माणूस अशाच कठोर शब्दांचा वापर करू इच्छित असेल. पत्रकार सारा दितुम यांनी 'मेरी मर्जी'वाला स्त्रीवाद हा असा खेळ असल्याचे उघड केले आहे, ज्यात समूहातील महिलांचे दुःख आणि शोषण हा खरा मुद्दाच नाही. मुद्दा आहे केवळ अशा काल्पनिक स्त्रीवादाच्या आदर्शांवर जगण्याचा, ज्यात उंच टाचांच्या सँडल, नग्न सेल्फी आणि आजूबाजूच्या पुरुषांविरुद्ध उभे राहणेच केवळ अभिप्रेत आहे. 'मेरी मर्जी'वाल्या स्त्रीवादाचा खरा फायदा केवळ विशेषाधिकार लाभलेल्या अत्यंत स्पष्टवक्त्या महिलांच्या छोट्याशा गटालाच होतो. मनाला वाटेल ती माझी पसंती हे प्रत्येकाला मिळालेले स्वातंत्र्य आहे, ही कल्पना निव्वळ ढोंगीपणाची आहे. कारण, स्वतःच्या इच्छेनुसार स्त्रीवाद हा स्त्रीवादाच्या वास्तविक विचारसरणीच्या विरुद्ध आहे.
'मेरी मर्जी'वाल्या स्त्रीवादाने खर्या स्त्रीवादाला कमकुवत केले आहे, यात शंकाच नाही. महिलांवरील अत्याचाराच्या समस्या लैंगिकमुक्तीच्या रूपात मांडल्या जाऊ लागल्यास आपण कोणत्या संभ्रमाच्या दिशेने जात आहोत, हे समजणे अवघड नाही. 'फेमिनिझम फॉर वुमन ः द रिअल रूट टू लिबरेशन' या पुस्तकाच्या लेखिका ज्युली यांचा असा विश्वास आहे की, स्त्रियांच्या नग्न प्रतिमा ही स्त्रीवादाची अभिव्यक्ती असू शकत नाही. स्त्रीवाद ही सर्व स्त्रियांना समानता आणि मुक्ती देण्यासाठी एक आवश्यक अशी सामाजिक चळवळ आहे. केवळ काही लोकांच्या निवडीच्या स्वातंत्र्याची नव्हे. पितृसत्ताक व्यवस्थेच्या अंतासाठी अनेक दशकांपूर्वी सुरू झालेली स्त्रीवादी चळवळ आज उन्मुक्तता आणि स्वच्छंदीपणाच्या दिशेने वाटचाल करत आहे, तसेच विशिष्ट व्यक्तींचे स्वातंत्र्य आणि उन्नती हेच स्त्रीवादाचे यश आहे, अशा स्वरूपाची मांडणी होऊ लागली आहे.
– डॉ. ऋतू सारस्वत,
समाजशास्त्राच्या अभ्यासक