साधुसंत येती घरा
साधुसंत येती घरा

साधुसंत येती घरा

चला आबुराव, जरा फेरफटका मारून येऊ!
जमणार नाही. आज आम्ही बिझी आहोत.
आम्ही? एकदम बिझी वगैरे?
आज आमच्या वाडीत साधू येणार आहेत.
कोणते म्हणे?
आहेत कोणीतरी शक्‍तिपीठाचे साधू.
ते येणार म्हणून तुम्ही का बिझी?
आम्ही कमानी लावणार, रस्ते सजवणार, पूजापाठाची तयारी करणार. ते तर मंत्रसामर्थ्याने कोणाचीही दुःख्खं दूर करतात म्हणे.
कोणाची केली? कोणती दुःख्खं दूर केली? तुम्ही पाहिलंय का काही स्वतःच्या डोळ्याने?
पाहायला कशाला हवं? साधुकृपेचा अनुभव घ्यायचा असतो. त्यांना फळं, मेवा, उंची वस्त्रं दान करायची असतात.
बघा बुवा. दान करा; पण ते सत्पात्री असू दे. उगाच कोणी बुवा, बाबा, संत, महंत उपटला की, लगेच पळत सुटू नका त्याच्यामागे.
तुम्ही एक पाखंडी असाल बाबुराव. आम्हाला का मागे सारता भक्‍तीमार्गावरून?
भक्‍ती करा हो, खुशाल करा; पण देवाची करा. ईश्‍वरी शक्‍तीची करा. मध्येच साधू कुठून येतात हे?
ते दिशा दाखवतात आमच्यासारख्यांना.
मध्येमध्ये आपापसात भांडतातही बहुतेक. तुमचं पीठ मोठं की आमचं? तुम्ही जास्त पॉवरबाज का आम्ही, अशी हमरीतुमरी करतात कधीकधी.
आपण ती बाजू बघू नये.
का? अंजनेरी की किष्किंधा यावरून जुंपलीये ती बघू नये?
तसे निर्णय जाणत्यांनी करावेत.
अहो, करताकरता एकेक साधू एकेका राजकीय पक्षाचा व्हायला लागतो, हे आपल्याला दिसतं ना? धर्मात बेमालूम राजकारण मिसळलं जातं यामधून.
त्याला आपण काय करणार?
निदान त्याच्या आहारी तरी जाऊ नये? बरं, अनेकदा हे नुसतं मानपानावर राहत नाही. हाणामारीपर्यंत, हत्यारं वापरण्यापर्यंत जातं.
कुठे हो?
मागे त्र्यंबकेश्‍वरात कालसर्पशांती विधीवरून पुरोहितांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती आबुराव. मथुरेच्या धर्मसभेने तर यावरही कडी केली.
ती कशी काय?
अहो, धर्मरक्षणासाठी वेळप्रसंगी हत्यारं बाळगली तरी चालतील, असंच जाहीर केलं तिथे. पुढे शांतीचा संदेश देणार कसे हे?
आपण काही त्यातले नाही बरं का? आपण आपले झांजा-टाळ वाजवू, पूजापाठ करू, प्रसाद खाऊ!
आणि त्यांनी उगाचच दोन गटांमध्ये वैराचा, चुरशीचा प्रसाद दिला तर?
आपण घेऊ नये तसला प्रसाद.
तसं होत नाही आबुराव. ऐका माझं. अहो, कधीकधी भक्‍तीचाही उन्माद चढायला लागतो आपल्याला. लोक काय, समूहाने मजा बघायला टपलेलेच असतात. समूहांना भडकवणं, चुकीच्या दिशेने बहकवणं सोपं जातं अशा भुरट्या साधुसंतांना.
मग काय, 'साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' वगैरे म्हणतात ते बेगडीच का सगळं तुमच्या मते? काही म्हणा, तुम्ही फारच संशयखोर बुवा!
संशय नका घेऊ वाटल्यास; पण सावध तरी राहा. साधुसंत येती घरा, आंधळा भक्‍तिभाव दूर सारा, एवढं तरी पथ्य हवंच!

logo
Pudhari News
pudhari.news