लवंगी मिरची : गुर्र आणि म्यांव !

लवंगी मिरची : गुर्र आणि म्यांव !

अहो, पेढे कशाचे वाटताय ते तर सांगा आधी ? काय म्हणताय वाघांची संख्या भारतात वाढली? खूप छान झाले. सर्व संबंधित लोकांचे अभिनंदन हो. चार वर्षांत वाघांची संख्या दोनशेने वाढली म्हणजे मोठेच यश म्हणावे लागेल. एकेक वाघ वाचवता वाचवता नाकी नऊ येतात तिथे अथक प्रयत्न करून 'वाघांना वाचवणे हे एक मोठेच काम होते, नाही का? नाही नाही.

राजकारणातील वाघांविषयी बोलत नाही, आपण जंगलातील वाघांविषयी चर्चा करतोय. राजकारणातील वाघांचा विषय घेतला, तर तो जास्तच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पाहा जंगलातले 'वाघ इकडून तिकडे आणि तिकडून इकडे भटकत असतात. उदाहरणार्थ यवतमाळ जिल्ह्यातील वाघ नजीक असलेल्या तेलंगणा राज्यातील अभयारण्यात कधी- कधी फिरायला जातात आणि तिकडे करमले, मन लागले तर तिकडेच राहतात. म्हणजे वाघांना राज्यांच्या सीमा कळत नाहीत ना? त्यांना काय माहिती कुठून कोणते राज्य सुरू होते आणि कुठे संपते ते? बिचारे या राज्यातून त्या राज्यात भटकत असतात म्हणूनच तर त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण जंगल कॉरिडोर तयार केले आहेत, होय की नाही?

जंगलातील वाघांचे असेच असते हो. आपल्या एरियात राहण्याचा कंटाळा आला, तर ते दुसऱ्याच्या एरियात जातात आणि मग दुसऱ्या एरियात असलेले वाघ आणि नवीन आलेले वाघ यांची फाईट होते. जो जिंकेल त्याच्या अधिपत्याखाली तो एरिया येतो; पण काही म्हणा वाघांची संख्या वाढल्याचा मला खूप आनंद आहे. सर्व पर्यावरण व वन्यजीव प्रेमींना खूपच आनंद झालेला आहे.

म्हणजे संपूर्ण जगात जेवढे वाघ आहेत, त्यापैकी ७५ टक्के वाघ आपल्या देशात आहेत. आणि आपल्या राज्यात जेवढे वाघ आहेत, त्यापैकी ९० टक्के वाघ विदर्भात आहेत. नाही हो, राजकारणातले म्हणत नाही मी. जंगलातल्या वाघांची चर्चा करतोय आपण पण काही म्हणा वाघाची मला कीवच येते. आयुष्यभर एकटा राहतो बिचारा. कारण, त्याचे कोणाशी पटत नाही ना.

वर्षातील फक्त जेमतेम सात ते आठ दिवस कामापुरता तो वाघिणीबरोबर राहतो एकदा का काम संपले की, त्याचा आणि वाघिणीचा संबंध नाही. ती वाघीण बिचारी पिलांना जन्म देते. त्यांचा अडीच- तीन वर्षे सांभाळ करते, त्यांना शिकार करायला शिकवते आणि मग त्या मोठ्या झालेल्या पिलांना आपले आपले करिअर करा म्हणून आदेश देते आणि स्वतः इतरत्र निघून जाते. माणसासारखं नाहीये हो वाघांचं, एकदा मूल जन्माला घातलं की, आपण स्वतः शेवटच्या दिवसापर्यंत त्या मुलांसाठी राबराब राबतो, खस्ता खातो, त्याच मुलांकडून अपमान सहन करतो आणि शेवटी जी काही आपली प्रॉपर्टी आहे, ती त्यांना देऊन स्वर्गाचा रस्ता धरतो. वाघांचं सोपं आहे. मुले मोठी झाली की, त्यांना घराबाहेर काढायचे आणि आपले आपले आयुष्य जगा म्हणून आदेश द्यायचा.

पण काहीही म्हणा आपल्याकडे वाघांची संख्या वाढली ही जगाला अभिमानाने सांगण्याचीच गोष्ट आहे. वाघासारख्या प्रवृत्तीची माणसे पण तितकीच जपली पाहिजेत हो. लढाऊ बाणा, वेळ आल्यास शत्रूला शिंगावर घेण्याची तयारी, आजूबाजूच्या परिसरावर चौफेर नजर आणि आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी २४ तास सावध असणारा वाघ आणि अशीच सर्व लक्षणे असलेली माणसे किमान महाराष्ट्रात तरी सांभाळली पाहिजेत. लढाऊ बाण्याच्या वाघांची संख्या वाढणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच लढाऊ बाण्याच्या मराठी लोकांची संख्या वाढणे आवश्यक आहे, हे नक्की.

– झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news