[author title="सुचित्रा दिवाकर" image="http://"][/author]
अलीकडेच भारताच्या 'अग्निकूल कॉसमॉस' या कंपनीने प्रथमच अग्निबाण नावाचे रॉकेट लाँच केले. गॅस आणि द्रवरूप इंधन या दोन्ही प्रकारच्या इंधनांचा वापर करणारे भारताचे हे पहिले रॉकेट इंजिन आहे. भारताने गतवर्षी चंद्राच्या दक्षिण धु्रवावर 'चांद्रयान-3'चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्याने आणि पहिले सौर मिशन आदित्य एल-वनच्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताच्या अवकाश क्षेत्राने मोठी बाजी मारली आहे. भारताचे ध्येय आता 2035 पर्यंत भारतीय अवकाशस्थानक स्थापन करण्याचे आहे.
काही दिवसांपूर्वी भारताच्या स्पेसटेक स्टार्टअपच्या 'अग्निकूल कॉसमॉस'ने मोठे यश मिळवले. या कंपनीने प्रथमच अग्निबाण नावाचे रॉकेट लाँच केले. गॅस आणि द्रवरूप इंधन या दोन्ही प्रकारच्या इंधनांचा वापर करणारे हे भारताचे पहिले रॉकेट इंजिन आहे. रॉकेट सोडण्याच्या मिशनला 'अग्निबाण सबऑर्बिटकल टँक डेमोस्ट्रेटर सर्टिडओटी' असे नाव दिले आहे. अग्निकूल कॉसमॉस हे भारताचे स्टार्टअप असून ही कंपनी रॉकेटची निर्मिती करते. या कंपनीने श्रीहरीकोटा येथे स्वत:चे लाँचपॅडही तयार केले आणि तेथेच या रॉकेटची चाचणी घेण्यात आली. अग्निबाण हे सिंगल स्टेजचे रॉकेट असून ते सेमी क्रायोजेनिक इंजिनवर काम करते. त्याची निर्मिती भारतातच झाली आहे आणि त्याची जुळणी आयआयटी मद्रास येथे अग्निकूलच्या सुविधा केंद्रात झाली.
अग्निबाण रॉकेटने आकाशात झेपावणे ही बाब भारतासाठी भूषणावह आहे. आतापर्यंत रॉकेट सोडण्याची सर्व जबाबदारी 'इस्रो'च्या खांद्यावर असायची. आता मात्र खासगी संस्थाही या द़ृष्टीने पाऊल टाकत आहेत. अग्निकूलने डेटा एक्झुजिशन सिस्टीम आणि फ्लाईट कॉम्प्युटर्सचा वापर करत त्याची शंभर टक्के निर्मिती कंपनीतच केली आणि म्हणूनच रॉकेटच्या यशाला आणखी महत्त्व आहे. एवढेच नाही, तर या चाचणीने टेस्ट व्हेईकलच्या 'प्रणोदन प्रणाली'ला नियंत्रित करणारी क्रमबद्ध वाहनाच्या (सॉर्टेड व्हेईकल) संपूर्ण 'एवियोनिक्स चेन'ची क्षमताही दाखविली. अग्निबाण रॉकेट हे कक्षेत शंभर किलोमीटरचा पेलोड 700 किलोमीटर उंचीपर्यंत नेऊ शकतेे. रॉकेटची लॉचिंग सिंगल पीस थ—ीडी प्रिंटेड रॉकेट इंजिनसह झाली असून अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच उड्डाण होय. या चाचणीतून भारताच्या अवकाश क्षेत्राचे सामर्थ्य जगाला दिसले आहे. अग्निबाण हे प्रक्षेपक असून तो एकाच टप्प्यात उपग्रहाला सोडू शकतो.
रॉकेटची उंची सुमारे 18 मीटर असून त्याचे द्रव्यमान 14 हजार किलो आहे. अग्निबाण हे पाच विविध आकाराच्या शंभर ते 300 किलो वजनापर्यंतच्या पेलोडला 700 किलोमीटर उंचीपर्यंत नेण्यास सक्षम आहे. अग्निबाण हे एक सबऑर्बिटल टेक्नॉलाजिकल डेमोस्ट्रेटर अग्निकूलच्या पेंटेटेड अग्निलेडमार्फत सोडण्यात येणारे प्रक्षेपक वाहन आहे. अग्निबाण रॉकेटला दहापेक्षा अधिक विविध प्रकारच्या लाँच पोर्टमधून सोडण्यासाठी सज्ज केले आहे. अन्य लाँच पोर्टशी अनुकूल राहण्यासाठी अग्निकूलने धनुष नावाचे एक लाँच पॅड स्थानकही तयार केले.
अग्निबाण रॉकेट सिंगल स्टेज रॉकेट असून त्याच्या इंजिनचे नाव अग्निलेट इंजिन आहे आणि ते पूर्णपणे थ—ीडी प्रिंटेड आहे. ते सहा किलो न्यूटनची जबरदस्त शक्ती तयार करणारे सेमीक्रायोजेनिक इंजिन आहे. अग्निबाण रॉकेटला पारंपरिक मार्गदर्शक सूचनेनुसार सोडले जाणार नाही. ते व्हर्टिकल सोडले जाईल. नियोजित मार्गावरूनच जाईल. अग्निकूलचे सहसंस्थापक आणि सीईओ श्रीनाथ रवीचंद्रन यांच्या माहितीनुसार, हे एक सबऑर्बिटल मिशन असून ते यशस्वी होत असेल, तर आपले ऑटोपायलट, नेव्हिगेशन आणि गायडन्स सिस्टीम योग्य रितीने काम करत आहेत की नाहीत, याचा शोध घेता येईल. देशातील नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अग्निकूल कॉसमॉसमध्ये पैसे गुंतवले आहेत. आनंद महिद्रा यांनी सुमारे 80.43 कोटी रुपयांचे फंडिंग केले आहे. या प्रकल्पात आनंद महिंद्रा यांच्याशिवाय पाय व्हेंचर्स, स्पेशल इन्व्हेस्ट आणि अर्थ व्हेंचर्स यांनीही गुंतवणूक केली आहे.