प्राईम टाइम कोणाचा?

प्राईम टाइम कोणाचा?
Published on
Updated on

नवा लागलेला मराठी सिनेमा पाहिलास का रे?
नाही जमलं अजून.
मला वाटलं होतं, तुझ्याकडून आतापर्यंत पारायणं झाली असतील त्याची. तुझ्या जवळच्या मैत्रिणीचा प्रोजेक्ट आहे ना, हा सिनेमा म्हणजे?
आहे तर. बाकी अशा मैत्रिणींना तर बुवा विशेष जपावं लागतंच.
म्हणूनच बहुतेक कधीपासून जप करत होतास, मैत्रिणीचा सिनेमा येणार आहे, नक्की बघणार आहे, वगैरे, वगैरे.
अजूनही तेच म्हणतोय. तो सिनेमा मी कधी ना कधी नक्की बघणार आहे.
पण, म्हणजे कधी? तो थिएटरांमधून उतरवला गेल्यावर?
नाही हो. खरा म्हणजे मला तो चित्रपटगृहात जाऊन, मोठ्या पडद्यावरच बघायचाय. सिनेमा ऐतिहासिक आहे, त्याच्यात घमासान लढाईची दृश्यं आहेत, तो चिटुकल्या घरगुती पडद्यावर बघण्यात काही अर्थ नाही.
एवढं सगळं कळतंय, मग घोडं कुठं पेंड खातंय आपलं?
टाइम जुळेना झालाय.
आपण ठरवलं की जुळतं सगळं.
काल संध्याकाळचा शो कॅन्सल केला वाटतं थिएटरवाल्यांनी. पुढे रात्री दीडला लावला होता तोच; पण तेव्हाच्या अडनिड्या वेळात मी सिनेमाभर जागा राहू शकेन की नाही, हे ठरत नव्हतं माझं.
छे!छे! रात्री दीड ते साडेतीन कोणी सिनेमा बघतं का? भलत्या जागरणाने पुढच्या दिवसाचे तीन तेरा वाजायचे. त्यापेक्षा दुसरी कोणतीही वेळ बरी.
नाही हो. सकाळी दहा ही तरी काय सोयीची, बरी वेळ म्हणायची का? तीही वर्किंग डे ला?
अच्छा, म्हणजे सकाळी दहाचा शोही होता वाटतं? एकूण, रात्री दीडचा आणि सकाळी दहाचा असे दोनच पर्याय होते का तो सिनेमा बघायला?
संध्याकाळी साडेपाचचाही एक शो होता. मात्र, तो खूपदा रद्द व्हायचा.
का? मराठी सिनेमाला प्रेक्षकांची फारशी गर्दी नसायची, म्हणून?किंवा दुसर्‍या हिंदी सिनेमाला जास्त गर्दी व्हावी म्हणूनही असेल. आमची आई त्या संध्याकाळच्या शोला गेली होती, तो रद्द झाल्यावर शेजारच्या स्क्रीनवरचा हिंदी पिक्चर बघून आली. बहुतेक प्रेक्षकांनी तसंच केलं तेव्हा. एकदा सिनेमाला गेल्यावर काहीच न बघता परत यावंस वाटत नाही माणसाला.
अरेरे! काय ही वेळ आली हो मराठी सिनेमांवर? एवढे जीव तोडून, आयुष्य पणाला लावून सिनेमे बनवायचे आणि शेवटी कायमचं डावलणंच बिचार्‍यांच्या नशिबी! प्राईम टाइम नेहमी दुसर्‍याच सिनेमांच्या खात्यावर जमा.
कधी म्हणायचं, लोकांना थिएटरमध्ये जाऊन बघायची सवय नाही. कधी रडायचं, सिनेमाचे शो हव्या त्या वेळेला लागत नाहीत, कधी म्हणायचं, धडपडत थिएटरला जावं तर वेगळाच सिनेमा माथी मारतात. आणि हे सगळं कुठे? तर मराठीच्या राजधानीत! मग इतरांकडून काय आशा बाळगावी?
सगळा प्राईम टाइमचा वांधा आहे हो!
प्राईम टाइम? खरंच की. एकाअर्थाने बरोबरच आहे हे. मात्र, प्राईम टाइम कोणाचा? हे बघायला हवं.
कोणाचा म्हणायचा मग?
एका अर्थाने सगळ्या मराठी चित्रपटसृष्टीचाच हो.
सध्या मराठी सिनेमांचा टाइम बुरा चल रहा है! एकदा त्या जगताचा प्राईम टाइम येऊ दे, मग बघा ते कुठल्या कुठे झेप घेतात ते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news