नाम गुम जायेगा?

नाम गुम जायेगा?
नाम गुम जायेगा?
Published on
Updated on

हॅलो आबुराव, कुठे आहात तुम्ही?
हॅलो, कोण बोलतंय? नीट ऐकू यीना झालंय.
हॅलो आबुराव, अहो मी बाबुराव बोलतोय. कुठे आहात तुम्ही? आज कट्ट्यावर आला नाहीत?
अहो, मी तात्यासाहेब झेलेंमध्ये बसलोय. येता का?
कुठे, कोणाकडे गेलायत?
तात्यासाहेब झेले उद्यानात बसलोय हो.
हे कुठलं नवं उद्यान आहे का?
जुनंच आहे, पण नावाची पाटी बदललीय. पूर्वी ज्याला सिल्व्हर ज्युबिली पार्क म्हणायचो ना, ते आता तात्यासाहेब झेले झालंय.
का?
काय माहीत? झालेलं दिसतंय खरं, त्यात मी माई जगदाळेंवर टेकलोय जरासा.
हॅलो, कशावर टेकलायत? कोण भाई?
भाई नाही हो. माई! नगरसेविका माई जगदाळे ह्यांच्या निधीतून बांधलेल्या बाकावर मी बसलोय. माझी पाठ टेकलीये त्या अक्षरांवरच.
माई जगदाळे म्हणताय ना? होत्या खर्‍या अशा नावाच्या नगरसेविका मागे.
त्या मागे असतील, तरी बाक बागेत अगदी पुढेच आहे त्यांच्या नावाचं. सहज दिसेल तुम्हाला. मारा चक्कर इकडे. मी वाट बघतो.
येतो जरा वेळाने; पण तात्यासाहेब झेले एवढे कोण होते हो? काही ऐकल्यासारखं वाटतंय का?
च्यक.
मग एकदम सगळं उद्यानच त्यांना बहाल करायचं म्हणजे जरा हे नाही वाटत?
मी मगाशीच इथल्या रखवालदाराला विचारलं. तो बोलला की, कोणी का असेना, त्याची नोकरी टिकली की झालं.
ते झेलंच, आपलं, झालंच! पण बाग म्युनिसिपालटीची ना?
होयच मुळी.
त्यात हे झेले कुठून उपटले आणि थेट पाटीवर झळकले?
असतील कोणा नगरसेवकाचे वडील, काका, मामा. आपल्याला काही त्रास तर होत नाही ना त्यांचा?
माझासुद्धा कोणाला काही त्रास नाहीये. माझं नाव कोणत्या उद्यानाला देता?
बाबुराव, तुमचा कोणी पुतण्या, भाचा नगरसेवक असेल किंवा होणार असेल तर तुमचं नावही झळकू शकेल बरं का! सहसा विकासकामांना नगरसेवक सहज आपल्या घरच्यांची नावं देऊ शकतात. तसा कुठे काही चान्स आहे का बघा.
म्हणजे मला स्वतःला काही फार तीर मारायची गरज नाही.
अजिबात गरज नाही. अहो, पुणे मनपाच्या सुमारे 200 सार्वजनिक उद्यानांपैकी 75 उद्यानांवर असेच कोणाकोणाचे काका, मामा लोक आयते जाऊन बसलेत.
काय सांगता?
डोळ्यांनीच बघा ना स्वतःच्या. स्वातंत्र्यसैनिक किंवा देशभक्त अशा पदव्या कोणाच्याही नावामागे लावायच्या अन् पाटीवर पुढेपुढे करायचं! तुम्हाला ह्यापैकी काय व्हायला आवडेल सांगा. स्वा.सै. होता की आपलं दे.भ.च बरं?
नको बुवा असली वाटमारी करायला. मालकी पालिकेची, पैसा जनतेचा, परस्पर नाव तेवढं आपलं! पटत नाही.
बघा. आख्खी बाग नको असेल तर एखादं बाकडं घ्या, एखादी कचराकुंडी घ्या,
कचराकुंडी का घेईन मी?
घ्या म्हणजे द्या. विकासनिधीतून तुमच्या नावे समाजाला भेट, जनहितार्थ मंजूर किंवा असंच काहीतरी गौरवाचं पेंट करून द्या. तेवढंच तुमचं नाव प्रकाशात येईल थोडे दिवस,
आणि वादाला विषयही होईल आयता! शेवटी नाम गुम जायेगा, कामही रह जायेगा, हेही कळू नये आपल्याला?
बघा बुवा. जे 75 बागांवर झालंय ते आणखी एका बागेवर होईल. मुळात आधी इथे उगवा तरी. तात्यासाहेब झेले उद्यान असं सध्याचं नाव आहे. लक्षात ठेवा. पुढच्या आठवड्यात आलात तर बदललेलं असू शकतं ते! कोणतं नाव कधी, का गुम होतं हे कधी कळतं का आपल्यासारख्याला?

  • – झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news