काश्मीरमध्ये सिनेमा…

काश्मीरमध्ये सिनेमा…
Published on
Updated on

तलावरचा स्वर्ग म्हणून जगभरात लोकप्रिय असलेल्या काश्मीरमधील बर्फाच्छादित पर्वत आणि नयनरम्य तलावांचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण असते. जगातली एक प्रमुख चित्रपटसृष्टी असलेल्या बॉलीवूडलाही काश्मीरच्या या निसर्गसौंदर्याचे वर्षांनुवर्षे आकर्षण आहे. मात्र, मोठ्या पडद्यावरील आपली चित्रपटांची भूक काश्मिरी जनतेला भागवता येत नव्हती. त्यांच्यासाठी ही करमणुकीची दारे बंद होती. ती आता उघडली जात आहेत. तब्बल तीस वर्षांनी काश्मीर खोर्‍यात सुरू झालेल्या चित्रपटगृहांमुळे काश्मीरच्या नागरिकांना पुन्हा एकदा ही संधी उपलब्ध होत आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शोपिया आणि पुलवामामध्ये दोन चित्रपटगृहांचे उद्घाटन केले. काश्मीरमधील पहिले आयनॉक्स मल्टिप्लेक्स पुढील आठवड्यात श्रीनगरमध्ये सुरू होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये मल्टिप्लेक्स सुरू करण्यात येणार असल्याचे मनोज सिन्हा यांनी जाहीर केले.

श्रीनगरमधील तीन मल्टिप्लेक्समध्ये 520 आसनांची व्यवस्था असेल. या मल्टिप्लेक्सची सुरुवात आमीर खानच्या 'लालसिंग चढ्ढा' या चित्रपटाद्वारे होणार आहे. काश्मीर खोर्‍यात तीस वर्षांनी चित्रपटगृह सुरू होणे ही एकूणच देशाच्या सांस्कृतिक जगतातील महत्त्वाची घटना. कारण, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या भारताला जोडणार्‍या ज्या काही प्रमुख गोष्टी आहेत, त्यामध्ये हिंदी सिनेमांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अनेक प्रांतांमध्ये हिंदी भाषा समजत नसली, तरीसुद्धा तिथे हिंदी सिनेमांचा आणि त्यातल्या कलावंतांचा मोठा प्रभाव आढळून येतो. मात्र, नव्वदच्या दशकात काश्मीर खोर्‍यात पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाने थैमान घातल्यानंतर काश्मीरमधील लोकांना चित्रपटगृहाची दारे बंद झाली. ज्या प्रदेशाच्या सौंदर्याने देशवासीयांच्या नजरेचे पारणे फेडले, तिथल्याच लोकांना ते चित्रपट पाहता येत नव्हते. काश्मीरला तेथील निसर्गसौंदर्याच्या उधळणीमुळे भारताचे स्वीत्झर्लंड म्हणूनही ओळखले जाते. निसर्गसौंदर्याबरोबरच अमरनाथ, वैष्णोदेवी मंदिरांसारख्या धार्मिक स्थळांमुळे देश-विदेशांतील पर्यटकांचा इकडे ओढा होता.

अनेक चित्रपटांच्या कथांमध्येही या धार्मिक स्थळांचे संदर्भ घेण्यात आले. त्यावरची गाणी चित्रीत करण्यात आली. असंख्य हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. श्रीनगर, पहलगामबरोबरच डल झील, सोनमर्ग, दूधपथरी, गुलमर्ग आदी ठिकाणे निर्मात्यांची चित्रीकरणासाठीची आवडती ठिकाणे. बॉबी, आप की कसम, ये जवानी है दिवानी, हायवे, जब तक है जान, बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटांची चित्रीकरणे जम्मू-काश्मीरमध्ये झाली आहेत. जगभरातील हिंदी चित्रपटांच्या रसिकांनी हे सौंदर्य पडद्यावर पाहिले आहे. काश्मीरचे चित्रपटांशी एवढे जिव्हाळ्याचे नाते असताना स्थानिक लोकांना मात्र बंदुकीच्या धाकामुळे या आनंदापासून वंचित राहावे लागले. 1980च्या दशकाच्या अखेरपर्यंत काश्मीरमध्ये अनेक सिनेमा थिएटर सुरू होती; परंतु वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे ती बंद करावी लागली. 1990च्या दशकात ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला; परंतु दुर्दैवाने दहशतवाद्यांनी चित्रपटगृहेच लक्ष्य करायला सुरुवात केल्यामुळे त्या प्रयत्नांना यश आले नाही.

चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेण्याची संधी काश्मीर खोर्‍यातील रसिकांना आणि विशेषतः तेथील तरुण पिढीला नव्याने मिळणार आहे. यामुळे तेथील तरुण पिढी मुख्य प्रवाहात येण्यास निश्चित मदत होईल. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलवर चित्रपट पाहता येत असले तरी काश्मीर खोर्‍यात इंटरनेट सेवा खंडित करण्याची वेळ वारंवार येत असते. आणि मोबाईलवर पाहता आले, तरीसुद्धा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद काही औरच असतो. देशभरातील नागरिकांना किंवा राज्याबाहेर गेलेल्या आपल्या बांधवांना ही संधी मिळू शकते. मात्र, आपल्याला नाही या भावनेमुळे त्यांच्यात तुटलेपणाची भावनाही निर्माण होऊ शकते. चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे ही भावनाही कमी होण्यास मदत होणार आहे. तीन दशकांपूर्वी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांच्या फतव्यामुळे श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला, सोपोर, हंदवाडा, कुपवाडामधील 19 चित्रपटगृहे एक जानेवारी 1990 ला बंद करण्यात आली. त्यानंतरही चित्रपटगृहे सुरू करण्याचे प्रयत्न झाले.

विशेषतः 23 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये तत्कालीन फारूख अब्दुल्ला सरकारने त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले; परंतु एका चित्रपटगृहात पहिल्याच चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि बारा लोक जखमी झाले, त्यामुळे हे प्रयत्न पुढे जाऊ शकले नाहीत. भाजप-पीडीपी सरकारनेही 2017 मध्ये त्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, कट्टरपंथीयांनी ते प्रयत्न हाणून पाडले. चित्रपटांद्वारे केले जाणारे मनोरंजन इस्लामच्या सिद्धांतांच्या विरोधात असल्याचे कट्टरपंथीयांचे मत होते. दरम्यानच्या काळात इंटरनेटने जग जवळ आले आणि स्थानिक तरुणांनाही जगाच्या जवळ नेले. त्याचमुळे असेल की, कट्टरपंथीयांच्या या धारणांच्या पलीकडे जाऊन चित्रपटगृहांच्या उद्घाटन समारंभासाठी तरुणांनी गर्दी केली.

श्रीनगरमधील पहिल्या मल्टिप्लेक्सची उभारणी धर कुटुंबीयांनी केली आहे. स्थानिक तरुणांचे बाहेर गेलेले मित्र जो आनंद घेतात, तो स्थानिक तरुणही घेऊ शकतील, असा विश्वास विजय धर यांनी व्यक्त केला आहे. श्रीनगरमधील मल्टिप्लेक्स आयनॉक्सच्या माध्यमातून डिझाईन करण्यात आले असून, तीन चित्रपटगृहे इथे उपलब्ध आहेत. इथे उत्तम दर्जाची साऊंड सिस्टीम असून, त्याचाही अनुभव पहिल्यांदाच काश्मीर खोर्‍यातील नागरिकांना मिळणार आहे. फूड कोर्ट आणि अन्य मनोरंजनाच्या साधनांचे पर्यायही उपलब्ध असतील. सिनेमा पाहायला जाणे आणि मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहायला जाणे हे वेगवेगळे जग आहे. दुसरे जग उच्चभ्रूंचे असले तरी सामान्य माणूसही कधीतरी त्या आनंदाची सफर करीत असतो. देशातील इतर भागांतील लोक दशका-दीड दशकापासून हा आनंद घेत आहेत. काश्मीर खोर्‍यातील लोकांनाही त्याचे अप्रूप वाटल्यावाचून राहणार नाही. काश्मीर खोर्‍यातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news