

आलो, आलोऽऽ कोण आलंय दरवाजापाशी?
मी आहे.
मी कोण? 'आप'ल्याला काही नाव आहे की नाही?
मी 'आप'लाच आहे सर!
अहो, अहो, झाडू काय उगारता अंगावर?
उगारत नाही. दाखवतो. मी 'आप', करेन सर्व साफ.
तुम्ही इथले नाही ना मूळचे? मग इथे कसे आलात?
तसा 2011 मध्ये दिल्लीत जन्मलोय मी; पण आता जमतील तसे देशभर हातपाय पसरायला बघतोय.
ते दिसतंच आहे; पण आमच्या पुण्यात का कडमड, सॉरी, अवतरलात? आम्ही हाडाचे साफ आहोत.
असं प्रत्येक आम आदमीला वाटतं; पण सत्यात तसं नसतं. आम्ही पुण्यात उघडलेली दहा कार्यालयं हेच सांगताहेत.
तुम्ही नेमकी घाणीच्या ठिकाणी उघडलीत की काय ही कार्यालयं?
नाही. पण, तरुणाईच्या ठिकाणी उघडली असं नक्कीच म्हणू शकता.
का? तरुण जास्त साफ असतात?
नाही. पण, जास्त लढवय्ये नक्कीच असतात असं अण्णा म्हणतात.
अच्छा, म्हणजे तुमच्या मते अण्णा हे सर्वात तरुण का?
होयच मुळी. केवढी पॉवर आहे त्यांच्यात?
पटत नाही. तुमचे अण्णा निम्म्या वेळा उपाशी असतात. खात नाहीत, खाऊ देत नाहीत.
पण, विचारांचा खाऊ मात्र चांगलाच पुरवतात ते. 2011 मध्ये दिल्लीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन छेडल्यापासून ते सारखं काहीतरी छेडत असतात ते काय उगाच?
छेडायची एकही संधी छोडत नाहीत, असं म्हणायचं का?
हे बघा. हे असं होतं तुम्हा लोकांचं. फुटकळ कोट्यांमध्ये टाईम पास करायचा! आमचं तसं नाहीये. 'आम'ची पुण्यात निदान 25 तरी जागा जिंकण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
पंजाबमधली आलेली सत्ता जरा जास्तच भिनलेली दिसते तुमच्यात!
नाही. नुसत्या राज्यसभेच्या यशावर खूश राहणारे आम्ही नाही.
म्हणून आमच्या म्युनिसिपालटीपासून सुरुवात करताय का?
आम्ही सर्वसामान्यांच्या म्हणजे आम आदमीच्या समस्यांपासून सुरुवात करतो नेहमीच.
करून बघा तसा प्रयत्न; पण पुण्यात कोणीच 'आम' नसतं, सगळे खास असतात, हे विसरू नका.
तरीसुद्धा, आम्ही पुण्यातली 50 टक्के उमेदवारी 40 वर्षे वयापर्यंतच्या कार्यकर्त्यांना देणार आहोत. त्यात डॉक्टर, वकील, प्राध्यापक यांच्यापासून अगदी रिक्षाचालक, वस्त्यांमधले कार्यकर्ते अशा सर्वांचा समावेश करणार आहोत. झूम मीटिंगा, कोपरा सभा वगैरे सुरूही केलंय आतापर्यंत.
चांगला प्रयत्न करताय म्हणा ना; पण पुण्यातली निवडणूक मुख्यत्वे दोन पक्षांतच होणार आहे ना?
असंच काही नाही. आम्ही म्हणा, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी म्हणा, आम्ही लोक नेहमीच्या काही मान्यवरांची गणितं बिघडवल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की!
शेवटच्या टप्प्यात कोण बंडखोरी करेल, हे कधीच सांगता येत नसतं हो; मात्र राजधानीत सत्तेवर मांड ठोकलीत म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीवर हुकूमत येईल, असं मानू नका राव! हं, हं, लगेच झाडू उगारायचं काम नाही. सध्या तो 'आप'ला 'आप'ल्यापाशीच ठेवा आणि मोजक्याच जागा हेरून त्यांच्यावर जोर द्या. कळलं ना?