लवंगी मिरची : आपत्तीत गच्छंती!

लवंगी मिरची : आपत्तीत गच्छंती!
Published on
Updated on

'केवढा उशीर केलात तात्या? मी कवाधरनं वाट बघतोय, जरा वेळेवर निघायचंत ना.'
'निघालो होतोच की!'
'मग कुठे माशी शिंकली?'
'खड्ड्यात. नुसती माशीच काय, सगळी वाहतूकच खड्ड्यात गेली याखेपेच्या पावसानं. खड्ड्यांमधून रस्ता सापडणं कठीण झालंय बघा.'
'त्यात काय नवीन आहे?'
'रस्त्यांवरचे बरेच खड्डे नव्यानेच पडलेत बहुतेक. पाऊसच तसा जबरी पडलेला ना यंदा!'
'कबूल. पडला पाऊस. अचाट पडला; पण हवामान खात्याचे तसे अंदाज येत होते ना आधीपासून?'
'त्यांना काय जातंय अंदाज नुसते सांगायला? इथे त्याच्याशी सामना करणारे जाताहेत बाराच्या भावात.'
'बरंं, खड्ड्यांची बाब सोडू घटकाभर. ठिकठिकाणी नाले तुंबले, पूर आले, जुनी झाडं कोलमडली, त्यांचं काय? अगोदर वाटेल तसे नाले बुजवले, वाटा वळवल्या, मागचा-पुढचा विचार न करता जुजबी डागडुज्या केल्या. आता भोगा म्हणावं.'
'असल्या झंझावातापुढे कोण टिकाव धरणार हो?'
'म्हणून काय दरवर्षी ही फरफट होऊ देणार?'
'तेवढं काही नाही बरं का, थोडेफार प्रयत्न करतात संबंधित खाती!'
'कधी? संकट ओढवल्यावर? मला सांगा तात्या, आपण सामान्य माणसंसुद्धा जमेल तेवढे पैसे साचवतो, जीवापाड विमा उतरवतो, तो का?'
'ऐनवेळी कामी यावेत म्हणून. भावी संकटाची तरतूद करावी, म्हणून. कुटुंबाची जबाबदारी असते ना डोक्यावर.'
'बघा. एका छोट्या कुटुंबासाठीही आपण दूरद़ृष्टी दाखवतो, मग सरकारने, म्युनिसिपालट्यांनी, व्यवस्थापनांनी आपापली जबाबदारी ओळखायला नको?'
'जाऊ द्या हो. निसर्ग आहे. असे प्रसंग ओढवणारच कधी ना कधी माणसांवर.'
'नुसतं माणसांचं नाही, प्राणीसुद्धा धोक्यात येऊ शकतात अशा अस्मानीत! पावसाच्या मार्‍याने एका प्राणीसंग्रहालयाच्या दगडी कनाती कोसळल्या तर आतली चितळं पळून बाहेर रस्त्यावर आली म्हणे. आली की नाही तीही संकटात? आणि माणसंही संकटात?'
'सरळ फोन करायचे त्या त्या खातेप्रमुखांना.'
'लोक मस्त करतील फोन. लागले तर पाहिजेत ते? आता मुळी लोकांनी काय काय करावं हा इथे मुद्दाच नाहीये. आपल्या सरकारला आपत्ती व्यवस्थापन अजिबात जमत नाहीये. हा मुद्दा आहे, दरवेळेला तहान लागली की, विहीर खणायची सवय, दुसरं
काय?'
'यावेळच्या पावसाने जरा जास्तच परीक्षा पाहिली म्हणायची.'
'यापुढे तो आणखीच चेकाळू शकेल बरं का! निसर्गाच्या लहरी आता अशाच फिरणार, अनिश्चितता वाढणार, सगळे पर्यावरणवाले सांगताहेत. प्रत्येक आपत्तीतून अशी गच्छंती ओढवली तर काय होईल आपलं?'
'देवाला काळजी.'
'असं म्हणून स्वस्थ बसू नका बरं. आता सगळ्या संभाव्य काळज्या लक्षात घेऊन माणसानेच सज्ज व्हायला हवंय.'

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news