अग्रलेख : अस्वस्थ चीन

पुढारी अग्रलेख
पुढारी अग्रलेख
Published on
Updated on

चीनच्या सैन्याने तैवानजवळ केलेला युद्धसराव म्हणजे तैवानसाठी कडक इशारा असल्याचे चीनने स्पष्ट केल्यामुळे यासंदर्भाने उभय देशांदरम्यान पुन्हा एकदा तणाव उफाळून आला आहे. एरव्ही या संघर्षाकडे फारसे गांभीर्याने पाहिलेही गेले नसते. परंतु, तैवानच्या बाजूने थेट अमेरिकाच उभी असल्यामुळे जगाच्या दृष्टीनेही हा संघर्ष चिंताजनक म्हणावा लागेल. तैवानच्या अवती भवती चीनच्या सैन्याने केलेल्या घेरावासंदर्भात अमेरिकेने चीनला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तैवानच्या म्हणण्यानुसार रविवारी चीनच्या जवळपास ७० विमानांनी त्यांच्या हद्दीजवळून उड्डाण केले आणि चीनची अकरा जहाजेही नजरेस पडली.

चीन आणि तैवानमधील संघर्ष वेगवेगळ्या निमित्ताने पुन्हा पुन्हा दिसून येतो. चीन अधूनमधून भारताची कुरापत काढत असतो, तसेच तैवानला धाकात ठेवण्याचा प्रयत्नही करीत असतो. ज्या ज्या वेळी तैवान आणि अमेरिका यांची जवळीक वाढल्याचे दिसते त्या त्या वेळी चीन तैवानाला इशारा देण्यासाठी काहीतरी आगळीक करीत असतो. गेल्या बुधवारी तैवानचे अध्यक्ष साई इंग-वेन आणि अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाचे प्रवक्ते केव्हिन मॅकार्थी यांची भेट झाली, त्यामध्ये त्साई यांनी अमेरिकेकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले होते. अमेरिकेच्या पाठिव्यामुळे तैवानच्या नागरिकांना सुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी म्हटले होते. या चर्चेची प्रतिक्रिया म्हणून चीनने हा सराव सुरू केल्याचे मानले जाते. मैकार्थी यांची तैवानचा दौरा करण्याची इच्छा होती. परंतु, चीनसोबतचा तणाव वाढू नये म्हणून ही भेट कॅलिफोर्नियामध्ये ठरवली गेली. या भेटीने चीनचे पित्त खवळले आणि युद्धसराव करून तैवानला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.

आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी तैवान धडपडत असून, तैयानला इशारा म्हणून हा युद्ध सराव केला गेला. चीनच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक विदेशी प्रतिनिधींनी त्साई इंग-वेन यांची भेट घेऊन तैवानला पाठिंबा दर्शवला. त्यावर चीनने त्साई यांच्या अमेरिका दौन्याशी संबंधित अमेरिकी गट आणि व्यक्तीवर प्रवास बंदी आणि आर्थिक निर्बंध लादले. यावरून एकूणच चीन किती अस्वस्थ आणि आक्रमक आहे, याची कल्पना येऊ शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये जगाचे राजकारण झपाट्याने बदलते आहे. जगभरातील देशांच्या परस्पर संबंधांचे संदर्भही बदलत आहेत.

तैवानची अर्थव्यवस्था जगासाठी. खूप महत्त्वाची असून, जगाच्या रोजच्या वापरातील इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट म्हणजे फोन, लॅपटॉप, घडयाळे, गेमिंग उपकरणांमध्ये ज्या चीप वापरतात त्या तैवानमध्ये तयार होतात. 'वन मेजर' नामक एक कंपनी जगातील निम्म्याहून अधिक बीपने उत्पादन करते. २०२९ मध्ये जगाचा चीपचा उद्योग जवळपास शंभर अब्ज डॉलर्सचा होता आणि त्यावर तैवानचा दबदबा आहे. चीनने भविष्यात कधी तैवानवर ताबा मिळवला, तर या सगळ्या उद्योगांवर चीनचे नियंत्रण येईल. यावरून जागतिक अर्थकारणातील तैवानचे महत्त्व, शिवाय तैवानवर कब्जा मिळवण्यासाठी चीनची धडपड समजून घेता येऊ शकते.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर अनेक बदल झाले. रशियाने विस्तारवादी आक्रमक धोरणाचा भाग म्हणून युक्रेनवर हल्ला केला, त्याच पद्धतीने चीनही तैवानवर हल्ला करू शकतो, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. रशिया आणि चीनचे परस्परांबद्दलचे प्रेम मधल्या काळात वाढत चालल्यामुळे त्या शक्यतांना बळकटी मिळत होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा तैवानला असलेला पाठिंबा महत्त्वपूर्ण मानला जातो. या प्रश्नावर अमेरिका बघ्याची भूमिका घेणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो वायडेन यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. चीनने हल्ला केल्यास तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिका लष्करी हस्तक्षेप करेल, असे त्यांनी निःसंदिग्धपणे म्हटले आहे.

त्याचवेळी चीनने आक्रमक भूमिकेत किंचितही बदल न करता याप्रश्नी कुणाही तिसऱ्या घटकाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या संघर्षाच्या मुळाकडे जाऊन काही बाबींचा विचारही करणे इष्ट ठरते, तैवान है। पूर्व चीनच्या किनान्यापासून सुमारे शंभर मैल दूर असलेले एक द्वीप. दुसऱ्या महायुद्धापासून चीन आणि तैवानमध्ये अंतर निर्माण झाल्याचे मानले जाते. त्यावेळी चीनच्या मुख्य भूमीमध्ये चिनी कम्युनिस्ट पाटीची सत्ताधारी नॅशनलिस्ट पार्टीशी (कुओमितांग) लढाई सुरू होती. १९४९ मध्ये माओत्से तुंगच्या नेतृत्वाखालील चिनी कम्युनिस्ट पार्टीचा विजय झाला आणि त्यांनी राजधानी बीजिंगवर ताबा मिळवला. त्यानंतर कुओमितांगचे लोक दक्षिण-पश्चिम द्वीप तैवानला पळून गेले. तेव्हापासून आजपर्यंत कुओमिंतांग हा तैवानचा सर्वात मोठा पक्ष आहे.

तैवानच्या इतिहासात जास्तीत जास्त काळ याच पक्षाचे सरकार राहिले. अमेरिका समर्थक अनेक देश असलेल्या पहिल्या द्वीप साखळीत तैवानचा समावेश आहे आणि अमेरिकन परराष्ट्र धोरणांमध्ये या द्वीपांना विशेष महत्त्व आहे. चीनच्या म्हणण्यानुसार तैवान हा त्यांचा एक प्रदेश असून, एक ना एक दिवस तो चीनचा भाग बनेल. दुसरीकडे तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानते. त्यांची स्वतःची राज्यघटना आहे आणि तिथे तेथील लोकांनी निवडून दिलेले सरकार कारभार करते.

जर चीनने तैवानवर कब्जा मिळवला तर पश्चिम प्रशांत महासागरात त्यांचे वर्चस्व वाढेल. त्यामुळे गुआम आणि हवाई द्वीपांवर असलेल्या अमेरिकन सैन्य ठिकाणांना धोका निर्माण होईल. चीनची लप्करी ताकद तैवानहून अनेक पटींनी जास्ती आहे, त्यामुळे चीनच्या हल्ल्यापुढे तैवानचा निभाव लागणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने दिलेला जाहीर पाठिंबा तानसाठी आधार वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, युक्रेनचे उदाहरण ताजे आहे. यूक्रेनला अमेरिकेचे समर्थन असले तरी सुरुवातीच्या काळातला अमेरिकेचे 'कातडीबचाव' धोरणही जगासमोर आहे. ते लक्षात घेऊन अमेरिकेच्या भरवशावर तैवानने काही धाडस करून युद्धाला निमंत्रण देणे आत्मघाताकडे नेणारे ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news